पेट्रोलचा नोजल टाकीला जोडलेलाच असताना कार निघाली; पूर्ण सिस्टमच मुळासकट उखडली, दहा लाखांचे पेट्रोल वाया
फोंडा : कुर्टी, फोंडा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना नोजल वाहनातून न काढताच कार पुढे नेल्याची घटना घडली. या घटनेत पेट्रोल वितरण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, भूमिगत पाईपलाईनलाही हानी पोहोचली. यामध्ये तब्बल ९ हजार ६०३ लिटर पेट्रोल वाया गेले असून, त्याची किंमत सुमारे ९.९८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती रिट्झ कारमध्ये पेट्रोल भरण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी पेट्रोल भरण्यासाठी वापरण्यात आलेला नोजल अद्याप कारच्या टाकीला जोडलेला असतानाच कारचालकाने वाहन पुढे नेले. त्यामुळे नोजलला जोडलेला पाईप जोरात ओढला गेला. यामुळे पेट्रोल वितरण यंत्रणा उखडली गेली आणि मोठे नुकसान झाले.
कार अचानक पुढे गेल्याने भूमिगत पेट्रोल पाईपलाईनलाही जोरदार धक्का बसला. पाईपलाईनचे नुकसान झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पेट्रोल बाहेर पडले. अंदाजे ९,६०३ लिटर पेट्रोल वाया गेले. या पेट्रोलची बाजारमूल्यानुसार किंमत सुमारे ९ लाख ९८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेमुळे पेट्रोल पंपाच्या यंत्रसामग्रीचे तसेच भूमिगत पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले आहे. पेट्रोल भरण्याच्या वेळी वाहनचालकाने अधिक काळजी घेण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे. संबंधित घटनेबाबत पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.