कार व्यावसायिकाचा खून उघडकीस
खेड :
चिपळुणातील सती येथील कार व्यावसायिक सुनील दादा हसे (54, मूळ रा. अंबड-अकोले, अहिल्यानगर) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलिसांनी मोहन पांडुरंग सोनार (54) रा. बोरसूत-संगमेश्वर), अक्षय सचिन जाधव (22, दोघेही रा. बोरसूत-संगमेश्वर) व वंदना दादासाहेब पुणेकर (36, रा. लेन-जयसिंगपूर, कोल्हापूर) या तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे. पैशाच्या हव्यासापोटी हा खून केल्याची कबुली या तिघांनी दिली.
27 एप्रिल रोजी पहाटे सुनील हसे यांना गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर कारमध्येच ओढणीने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला. खूनानंतर मृतदेह मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील कशेडी घाट रस्त्यालगत फेकून देत ते पसार झाले होते.
खुनानंतर 30 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मृतदेह घाटात कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. भोगाव-पोलादपूरच्या पोलीस पाटील शुभांगी उतेकर यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 4 दिवसातच अक्षय जाधव याच्या मुसक्या आवळल्यानंतर खून प्रकरणाचा छडा लागला. मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलादपूर पोलिसांसमोर असतानाच तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे अखेर ओळख पटवत पोलिसांनी तपासाला गती दिली गेली. अक्षय जाधव याच्याकडून पोलिसांच्या हाती धागेदेरे लागल्यानंतर मृतदेह फेकून पसार झालेल्या अन्य दोन संशयितांच्या मागावर पोलादपूर पोलीस होते. दोन्ही संशयित आपली ओळख लपवत कर्नाटक-सीमावर्ती भागात लपून सलग दोन महिने पोलादपूर पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर दोघांनाही पकडत पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा केला.
- लिफ्ट देण्याच्या निमित्ताने झाली ओळख
प्राप्त माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील सती येथे वास्तव्यास असलेले सुनील हसे व्हॅगनार कार (एमएच 15 डीएस 8005) भाडेतत्त्वावर देत स्वत:ही कार चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. लिफ्ट देण्याच्या निमित्ताने त्यांची ओळख संशयित वंदना पुणेकर हिच्याशी झाली. यादरम्यान, संशयित महिलेला सुनील हसे हे श्रीमंत आणि सधन वाटल्याने त्यांना जाळ्यात ओढले. परंतु त्यांच्याकडे फारसे काहीही आढळून न आल्याने अखेर संशयित अक्षय जाधव याच्या मदतीने त्याला संपवण्याचा घाट घातला. यासाठी तिने मोहन सोनार याचीही मदत घेतली. संशयित महिलेने सुनील हसे यांच्या कारमध्येच मागील आसनावर बसून 27 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास त्यांना गुंगीचे औषध पाजले. कार कराड-चिपळूणमार्गे पोलादपूर दिशेने आणत कारमध्येच ओढणीने गळा आवळून त्यांचा खून केला. यानंतर मृतदेह कशेडी घाटातील जुन्या महामार्गालगत काँक्रिटच्या संरक्षक कठड्यातून दरीत फेकल्याची कबुली संशयित महिलेने पोलिसांना दिली.
- पोलादपूर पोलिसांचे कौतुक
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, महाड पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवालदार तुषार सुतार, पोलीस नाईक, अनुजित शिंदे, महिला पोलीस शिपाई बनसोडे यांचा पथकात समावेश होता. पोलादपूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
- अटकेतील महिलेचा 5 जणांशी घरोबा
कार व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी पोलादपूर पोलिसांनी गजाआड केलेल्या वंदना पुणेकर हिने पाच जणांशी घरोबा करत त्यांची फसवणूक केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सांगली जिल्ह्यात तिच्यावर दोन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. या महिलेचे आणखी कारनामे उघडकीस आणण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी तपासाला गती दिली आहे.