कार ट्रॉलीखाली घुसली : एक ठार,एक जखमी
इस्लामपूर :
पुणे-बेंगलोर अशियायी मार्गावर वाघवाडी फाटा दरम्यान बाँम्बे रेयॉन कंपनीसमोर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कारने मागून जोरात धडक दिली. अपघातात कारमधील अनिल देवीदास गवाने (वय 38, रा. अढळगाव, ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर) हे ठार झाले. तर चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात र]िववारी रात्री झाला.
शरद दादा जाधव (रा. अढळगाव, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर) हे गंभीर जखमी झाले. मृत गवाने व जाधव यांच्यासह त्यांचे काही सहकारी तिरुपती बालाजीला गेले होते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेवून पुण्याकडे चालले होते. वाघवाडी फाटा ओलांडून पुढे काही अंतरावर बाँम्बे रेयॉनसमोर आल्यानंतर कार चालक जाधव यांचे नियंत्रण सुटले. समोरील उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की ही कार ट्रॉलीखाली घुसली. यामध्ये बाजूस बसलेले गवाने गंभीर जखमी झाले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. चालक जाधव हे गंभीर जखमी आहेत.
या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक राजेंद्र वसंत पवार (रा. इटकरे) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत रस्त्याच्या परस्थितीकडे दुर्लक्ष करत, हयगयीने वाहन चालवून गवाने यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघांचे नशिब बलवत्तर
कारमधून पाचजण तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेवून ते पुण्याकडे परतत होते. दरम्यान वाठारजवळ आल्यानंतर त्यांच्यात काहीसा वाद झाल्याने त्यातील तिघेजण कारमधून उतरले. त्यांनी अन्य वाहनाने पुण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 20 ते 25 कि.मी. अंतर पुढे आल्यानंतर हा अपघात होवून गवानेवर काळाने झडप घातली. वादानंतर कारमधून उतरल्यानेच तिघेजण बचावले, असल्याची चर्चा घटनास्थळी होती.