ट्रम्प शपथविधीसाठी ‘कॅपिटॉल’ सज्ज
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा आज शपथग्रहण कार्यक्रम : देश-विदेशातील मान्यवर वॉशिंग्टनमध्ये दाख
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. ‘कॅपिटॉल’मधील व्यासपीठ सज्ज झाले असून निमंत्रित पाहुणे येऊ लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. हा सोहळा अमेरिकेतील वेळेनुसार दुपारी 12 वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार सोमवार, 20 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजता होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हातात दोन बायबल घेऊन शपथ घेतील. यावेळी शपथविधी सोहळ्यात अनेक गोष्टी वेगळ्या दिसतील. तीव्र थंडीमुळे शपथविधीचा कार्यक्रम मोकळ्या जागेत न घेता ‘इनडोअर’ होणार आहे. भारतासह जगभरातील लोकांना ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची उत्सुकता आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी डोनाल्ड ट्रम्प राजधानी वॉशिंग्टनमध्ये पोहोचले आहेत. ट्रम्प यांनी शनिवारी दुपारी फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीचवरून हवाई दलाच्या सी-32 लष्करी विमानाने उ•ाण केले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया आणि मुलगा बॅरन ट्रम्प होते. या उड्डाणाचे नाव स्पेशल एअर मिशन-47 असे होते. मिशन-47 म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांना हे विमान उपलब्ध करून दिले. अमेरिकेत मावळते अध्यक्ष नवीन राष्ट्राध्यक्षांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देत असतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी विक्रमी संख्येने कार्यकारी आदेश जारी करण्याची तयारी केली आहे. ट्रम्प त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या दिवशी 100 हून अधिक फायलींवर स्वाक्षरी करू शकतात असे सांगितले जात आहे. कार्यकाळाच्या सुरुवातीपूर्वी त्यांच्या टीमने हे आदेश तयार केले आहेत. या आदेशांसंबंधीच्या फाईल्स ओव्हल ऑफिसमधील ट्रम्प यांच्या दालनात ठेवण्यात आलेल्या आहेत. ट्रम्प यांच्या निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने हे आदेश तयार करण्यात आले आहेत. ‘मी पहिल्याच दिवशी विक्रमी संख्येने ऑर्डरवर स्वाक्षरी करण्याची योजना आखत आहे’, असे ट्रम्प यांनी अलिकडेच एका मुलाखतीत स्पष्ट केले होते.
शपथविधीनंतर ट्रम्प भारत-चीन दौऱ्यावर?
पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प भारत आणि चीन या देशांना भेट देण्याची योजना आखत आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी घनिष्ठ मैत्री आहे. त्यामुळेच शपथविधीनंतर ते भारत दौऱ्यावर येण्याची योजना आखत आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांनुसार ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांशी त्यांच्या संभाव्य भारत भेटीबद्दल चर्चा केली आहे. नवी दिल्लीला भेट देऊन ट्रम्प संपूर्ण जगाला भारत-अमेरिका मजबूत संबंधांचा संदेश देऊ इच्छितात. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि अमेरिकेची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे हेही तो जगाला दाखवू शकतात. भारतासोबतच ट्रम्प चीनला भेट देण्याचा विचार करत असल्याचेही बोलले जात आहे. तथापि, आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी चीनवर अतिरिक्त शुल्क लादण्याचा इशारा दिला होता.
शपथविधीविरोधात निदर्शने
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभापूर्वीच देशाच्या अनेक भागात त्यांच्या विरोधात निदर्शने झाली आहेत. शनिवारी हजारो लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने केली. राजधानी वॉशिंग्टनमध्येही अनेक स्वयंसेवी संस्थांच्या गटाने ‘पीपल्स मार्च’ या बॅनरखाली ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध निदर्शने केली. याप्रसंगी निदर्शकांनी ट्रम्प यांच्यासोबतच एलॉन मस्क आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांविरुद्ध पोस्टर आणि बॅनरद्वारे निषेध केला. या गटाने यापूर्वी जानेवारी 2017 मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या शपथविधीलाही विरोध केला होता.
शपथविधी सोहळ्यातील महनीय व्यक्ती...
अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मेली, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, भारताकडून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क, अमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझोस आणि मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीही मंत्रिमंडळातील एका प्रतिनिधीला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. शी जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे फोनवरून अभिनंदन केले आहे. ट्रम्प यांच्या भव्य-दिव्य सोहळ्यासाठी देश-विदेशातील दोन लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.