8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य दोन लाख कोटींनी घटले
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय शेअर बाजारात मागच्या आठवड्यात आघाडीवरच्या 10 पैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 2 लाख 1699 कोटी रुपयांनी घसरले असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचे मूल्य मोठ्या प्रमाणात कमी झालेले पाहायला मिळाले.
शुक्रवारी संपलेल्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1181 अंकांनी किंवा 1.43 टक्के इतका घसरणीत राहिला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 60,824 कोटी रुपयांनी कमी होत 19,82,282 कोटी रुपयांवर राहिले होते. याचप्रमाणे टीसीएस कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 34,136 कोटी रुपयांनी कमी होत 16 लाख 12 हजार 762 कोटी रुपयांवर घसरले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार मूल्य सुद्धा 29 हजार 495 कोटी रुपयांनी घसरत 6 लाख 98 हजार 440 कोटी रुपयांवर घसरले. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार मूल्यसुद्धा 28 हजार 379 कोटी रुपयांनी कमी होत 8 लाख 76 हजार 207 कोटी रुपयांवर खाली आले होते. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे बाजार मूल्य 17 हजार 061 कोटींनी कमी झाले असून ते आता 7 लाख 89 हजार 819 कोटी रुपयांवर आले होते.
एलआयसीचे मूल्य सुद्धा 16381 कोटी रुपयांनी कमी होत 6 लाख 57 हजार 9कोटी रुपयांवर राहिले होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल मूल्य मात्र 14,179 कोटी रुपयांनी वाढले होते. कंपनीचे एकूण बाजार भांडवल मूल्य 6 लाख 66 हजार 919 कोटी रुपयांवर पोहोचले. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य सुद्धा मागच्या आठवड्यात 3735 कोटी रुपयांनी वाढत 12 लाख 47 हजार 941 कोटी रुपयांवर पोहोचले होते.
सप्टेंबरमध्ये 11 हजार कोटीची विदेशी गुंतवणूक
अमेरिकेमध्ये व्याजदर कपातीची शक्यता लक्षात घेऊन विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारामध्ये 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सदरची गुंतवणूक झाल्याचे समजते. विदेशी गुंतवणूकदारांनी एप्रिल-मे मध्ये जवळपास 34 हजार 252 कोटी रुपये बाजारातून काढले होते. 6 सप्टेंबरपर्यंत विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारानी 10 हजार 978 कोटी रुपये भारतीय शेअर बाजारात गुंतवले आहेत.