For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किल्ला भाजी मार्केट जागेवर कॅन्टोन्मेंट उभारणार पार्किंगतळ

10:19 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
किल्ला भाजी मार्केट जागेवर कॅन्टोन्मेंट उभारणार पार्किंगतळ
Advertisement

बेळगाव : किल्ला भाजी मार्केट परिसर 2019 पासून वापराविना पडून आहे. या खुल्या जागेचा कॅन्टोन्मेंट बोर्डला कोणताच उपयोग झालेला नाही. त्यामुळे या जागेचा वापर करून महसूल वाढविण्याचा प्रयत्न कॅन्टोन्मेंटने सुरू केला आहे. जुन्या भाजी मार्केटची अर्धवट बांधकामे पाडवून त्या ठिकाणी खासगी बससाठी पार्किंगतळ उभारण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डने घेतला आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीत किल्ला भाजी मार्केट येथे यापूर्वी भाजी खरेदी-विक्रीचा व्यवहार चालत होता. परंतु, पार्किंगची समस्या, वाहतूक कोंडी यामुळे 2019 मध्ये हे भाजी मार्केट एपीएमसी यार्डमध्ये हलविण्यात आले. किल्ला येथील भाजी मार्केटमध्ये असणारी 120 भाजीची दुकाने एपीएमसीमध्ये हलविण्यात आली. दुकाने हलविण्यात आली तरी दुकानांचे बांधकाम अद्यापही तसेच आहे. मागील पाच वर्षात या ठिकाणी कोणताही नवा प्रकल्प राबविण्यात आला नाही. त्यामुळे ही जागा वापराविना पडून आहे.

Advertisement

कॅन्टोन्मेंटच्या या जागेमध्ये रात्रीच्यावेळी गैरधंद्यांना ऊत आला आहे. गांजा, मद्य यांच्या विक्रीसोबतच अश्लील प्रकारही सुरू असल्याने नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली होती. शहराच्या मध्यवर्ती भागात अशा खुल्या जागेचा योग्य वापर करावा, अशी मागणी होत होती. कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीव कुमार यांनी या संपूर्ण जागेचा आढावा घेऊन या जागेचा नव्याने वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत या जागेच्या पुनर्वापराबाबत चर्चा करण्यात आली. जुने भाजी मार्केटचे बांधकाम पाडवून त्या ठिकाणी खासगी वाहनांसाठी पार्किंगतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे खासगी वाहने लावण्याची समस्या काही प्रमाणात दूर होईल. तसेच यातून कॅन्टोन्मेंटलाही महसूल मिळणार आहे. पार्किंगतळ झाल्यास या ठिकाणी सुरू असणारे गैरधंदे बंद होणार आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंटकडून या पार्किंगतळासाठी निविदा केव्हा काढल्या जातात, हे पहावे लागणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.