For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्टोन्मेंटकडून विनापरवाना बांधकामांवर होणार कारवाई

07:38 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंटकडून विनापरवाना बांधकामांवर होणार कारवाई
Advertisement

बैठकीत निर्णय : शाळांबाबत घेणार कायदेशीर सल्ला : अनधिकृत बांधकामांवरून शाब्दिक चकमक

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

कॅन्टोन्मेंटमध्ये काही जणांकडून विनापरवाना बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे अशा बांधकामांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. तसेच काही शाळांकडून विनापरवाना बांधकाम झाले असून त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन त्यानंतर कारवाई करण्याचा इशारा कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सोमवारी झालेल्या बैठकीत देण्यात आला. अनधिकृत बांधकामांवरून बैठकीत सदस्य व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

Advertisement

कॅम्प येथे एका खासगी शाळेचे बांधकाम बंगलो एरियामध्ये करण्यात आले असून त्यासाठी कॅन्टोन्मेंटची परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे याची तक्रार सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी संरक्षण मंत्रालयाच्या समितीकडे केली होती. संरक्षण मंत्रालयाने याबाबत कॅन्टोन्मेंटला पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी केली आहे. शाळा व्यवस्थापनाकडून बांधकामासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. परंतु शैक्षणिक हेतूने याबाबत कशा प्रकारे मार्ग काढता येईल, यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जाणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. या प्रकरणावरून बैठकीत वातावरण तापल्याचे दिसून आले.

कॅन्टोन्मेंटमधील इतर बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच काही शाळांमध्ये तात्पुरते शेड उभारण्यात आले असून त्याबाबतही कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. पार्किंग कंत्राटदाराकडून एकूण 14 लाख रुपये येणे बाकी होते. त्यापैकी 9 लाख रुपये कॅन्टोन्मेंटकडे देण्यात आले आहेत. परंतु उर्वरित 5 लाख रुपये येणे आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला मुदतवाढ देऊन ती रक्कम जमा करून घेण्याची सूचना करण्यात आली. यापुढे रस्त्याशेजारील विव्रेत्यांकडून कर जमा करण्याची जबाबदारी कंत्राटी पद्धतीने पार पाडण्याबाबत निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या सीबीआय चौकशीविषयीही चर्चा झाली.

सरकारी कार्यालयांचा चार कोटींचा कर थकीत

कॅन्टोन्मेंटमधील थकबाकी वाढत असल्याने अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की एकूण 6.6 कोटी रुपयांची कॅन्टोन्मेंटची थकबाकी आहे. त्यापैकी 4 कोटी रुपये हे सरकारी कार्यालयांचे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कर थकविला असल्याने कॅन्टोन्मेंटकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून कर भरण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

काही बंगलो एरियामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने वेळेवर स्वच्छता होत नसल्याचे सुधीर तुपेकर यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले अद्याप थकीत असून ती तातडीने देण्यासाठी समितीची स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली. रस्त्याच्या कामांना केव्हा सुरुवात होईल, अशी विचारणा केली असता, येत्या आठवडाभरात डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असून काँक्रिटीकरणाचे काम दसऱ्यानंतर केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बैठकीला कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, सीईओ सुदाम मंचलवार, बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ, सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांसह इतर उपस्थित होते.

स्क्रीनद्वारे बैठकीचे प्रक्षेपण

कॅन्टोन्मेंट बैठकीतील कामकाजाची माहिती व्हावी यासाठी नागरिक उपस्थित होते. त्यांना कार्यालयाच्या बाहेर स्क्रीनवर बैठकीचे प्रक्षेपण दिसत होते. परंतु पुरेसा आवाज येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. तीन ते चारवेळा कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांना कळवूनदेखील त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांनी उठून जाणे पसंत केले. त्यामुळे पुढील वेळेला तरी नागरिकांना व्यवस्थित आवाज पोहोचेल याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.

Advertisement
Tags :

.