कॅन्टोन्मेंट संघाकडे फिनिक्स चषक
12 व्या फिनिक्स चषक स्पर्धेत अफताब शेख उत्कृष्ट खेळाडू तर सर्वोत्तम गोलरक्षक श्रेयस
बेळगाव : फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित फिनिक्स चषक 17 वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कॅन्टोन्मेंट संघाने गतविजेत्या सेंट झेवियर्सला 1-0 असा निसटता पराभव करून 12 वा फिनिक्स चषक पटकाविला. अफताब शेख उगवता खेळाडू तर उत्कृष्ट गोलरक्षक श्रेयस यांना गौरविण्यात आले. होनगा येथील फिनिक्स मैदानावरती सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कॅन्टोन्मेंट संघाने इस्लामिया संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला.
10 व्या मि. कॅन्टोन्मेंटच्या साद देसाईने मारलेला वेगवान फटका इस्लामियाच्या गोलरक्षकांने उत्कृष्ट अडविला. सामन्याच्या 18 व्या मि. कॅन्टोन्मेंटच्या साद देसाईच्या पासवर अफताब शेखने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 32 व्या मि. ला इस्लामियाच्या साहीदने गोल करण्याची नामी संधी दवडली. 40 व्या मि. ला कॅन्टोन्मेंटच्या साद देसाईने मारलेला फटका गोल पोस्टला लागून बाहेर गेला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट झेवियर्सने एमव्हीएमचा संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 17 व्या मिनिटाला झेवियर्सच्या ऐवान शेखच्या पासवर माहीद बडेघरने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 35 व्या मि. ला झेवियर्सच्या माहीद बडेघरच्या पासवर ऐवान शेखने गोल करून 2-0 ची महत्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात एमव्हीएम संघाला गोल करण्यात अपयश आले.
अंतिम सामना सेंट झेवियर्स व कॅन्टोन्मेंट या सामन्याचे उद्घाटन माजी बुडा अध्यक्ष अनिल पोतदार व इतर मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करून अंतिम सामन्याची सुरूवात करण्यात आली. या सामन्यात 7 व्या मि. ला कॅन्टोन्मेंटच्या साद देसाईने मारलेला फटका गोल पोस्टला लागून बाहेर गेला. 12 व्या मि. ला झेवियर्सच्या माहीद बडेघरने मारलेला वेगवान फटका कॅन्टोन्मेंटच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट अडविला. या सत्रात दोन्ही संघाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या होत्या. पण दवडल्या गोलफलक कोराच राहिला.
दुसऱ्या सत्रात 29 व्या मि. ला कॅन्टोन्मेंटच्या अफताब शेखच्या पासवर साद देसाईने गोल करून 1-0 ची महत्वाची आघाडी कॅन्टोन्मेंटला मिळवून दिली. 33 व्या मि. ला झेवियर्सच्या ऐवान शेखने गोल करण्याची नामी संधी दवडली. सामन्यानंतर प्रमुख पाहूणे अनिल पोतदार प्राचार्य विद्या वगण्णावर, सेंट झेवियर्सचे फादर चार्ली ब्राजेस व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या कॅन्टोन्मेंट व उपविजेत्या सेंट झेवियर्स संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू अफताब शेख कॅन्टोन्मेंट उगवता खेळाडू जैन मुल्ला, तर उत्कृष्ट गोलरक्षक श्रेयस, आर.एन.सिंग यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अमिन बेपारी, कृष्णा मुचंडी, फिरोश शेख, चेतन्य, इम्रान बेपारी यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अरूण कांबळे, महांतेश गवळीसह फिनिक्सच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.