कॅन्टोन्मेंटमधील रस्ते कोल्ड मिक्सद्वारे बुजविणार
तरुण भारतच्या वृत्तानंतर कॅन्टोन्मेंटला जाग
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांची झालेली दुरावस्था तरुण भारतने समोर आणताच कॅन्टोन्मेंट प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यासाठी कोल्ड तार मिक्सचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात का होईना पण कॅम्पमधील रस्त्यांवरील खड्डेs कमी होण्यास मदत होणार आहे.
कॅम्पमधील बेऊर रोड, कॅटल रोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग (हायस्ट्रीट) या रस्त्यांची पूर्णता दुरवस्था झाली आहे. कॅटल रोड व बेऊर रोडवर तर वाहने चालविणेही अवघड झाले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांमुळे यंदेखूट मार्गे गणेशपूरला जाणाऱ्या वाहनचालकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे अपघात होऊन एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यास कॅन्टोन्मेंट प्रशासन जबाबदारी घेणार का? असा प्रश्न वृत्ताद्वारे तरुण भारतने उपस्थित केला होता.
याची दखल घेत कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचलवार यांनी तातडीने कोल्ड तार मिक्सद्वारे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची सूचना कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांना दिली आहे. येत्या दोन दिवसात या कामाला सुरुवात होणार आहे.
रस्त्यांसाठी आमदार फंडातून 6 कोटी रुपये
बेऊर रोड, कॅटल रोड व छत्रपती शिवाजी महाराज मार्ग या रस्त्यांच्या विकासासाठी आमदार आसिफ सेठ यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारकडून 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये कॅटल रोडचे काँक्रीटीकरण व गटारीची व्यवस्था केली जाणार आहे. बेऊर रोडरचे रुंदीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज मार्गाचे डांबरीकरण होणार आहे. हे काम राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागाकडून केले जाणार असून कॅन्टोन्मेंटने 25 जून 2026 ला परवानगीही दिली आहे. त्यामुळे पावसाळा संपताच या कामाला सुरुवात होणार आहे.
रस्त्यातील खड्डे कोल्ड तार मिक्सने बुजविणार
कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध नसल्याने रस्त्यांचे काम रखडले होते. आमदार फंडातून निधी उपलब्ध झाला असून पाऊस कमी होताच कामाला सुरुवात होईल. त्यापूर्वी कोल्ड तारद्वारे खड्डे तात्पुरते बुजविले जाणार आहेत.
? सुदाम मंचलवार,
सीईओ कॅन्टोन्मेंट