व्यवसाय परवान्यांसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डची मोहीम
परवान्याविना व्यवसाय करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डअंतर्गत येणाऱ्या व्यावसायिकांना 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता व्यवसाय परवाना घ्यावा लागणार आहे. कॅन्टोन्मेंटने ई-छावणी पोर्टलद्वारे ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. व्यवसाय परवाना न घेता व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढील काळात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा कॅन्टोन्मेंटने दिला आहे. कॅम्प, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अनेक व्यावसायिक व्यवसाय करत आहेत. या सर्वांना व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन आर्थिक वर्षात व्यवसाय परवाना मिळविण्याची मोहीम बोर्डने सुरू केली आहे. ज्या व्यावसायिकांना कार्यालयात जाणे शक्य नाही, अशांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. व्यवसाय परवान्यासाठी 150 रुपये सशुल्क अर्ज करावा लागणार आहे. दि. 25 मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.
अन्यथा दंडात्मक कारवाई
व्यवसाय परवान्यातून कॅन्टोन्मेंटला महसूल मिळत असतो. परंतु बरेच व्यापारी व्यवसाय परवाना न काढता व्यवसाय चालवित असतात. यामुळे कॅन्टोन्मेंटचे नुकसान होत आहे. यापुढे परवाना नसताना व्यवसाय करणाऱ्यांवर पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा कॅन्टोन्मेंटने दिला आहे. त्यामुळे व्यवसाय परवाना घेऊनच आता कॅन्टोन्मेंटमध्ये व्यवसाय करावा लागणार आहे.
तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यामागचे गौडबंगाल काय?
कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांकडून लहान व्यापाऱ्यांनाच व्यवसाय परवान्यासाठी टार्गेट केले जात असून मोठे व्यापारी मात्र मोकाट आहेत. अनेक थिएटर, मंगल कार्यालय, लाकडांचे अड्डे यासह मोठी आस्थापने यांच्याकडून व्यवसाय परवाना घेण्यात आला नसल्याची तक्रार सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी कॅन्टोन्मेंटच्या मासिक बैठकीत केली होती. परंतु त्यांच्या या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने या मागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.