कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचारी पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात
सीबीआय पथक दाखल झाल्याने धाबे दणाणले
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमधील कर्मचारी भरती भ्रष्टाचार प्रकरणाला पुन्हा एकदा नवी कलाटणी मिळाली आहे. मागील दोन दिवसांपासून सीबीआयचे पथक बेळगावमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे या भ्रष्टाचार प्रकरणात गुंतलेले पॅन्टोन्मेंटचे कर्मचारी तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. सीबीआय पथक दाखल झाल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डमधील एकूण 29 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या भरती वेळी लाखो ऊपयांचा भ्रष्टाचार करून कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी सीबीआय यंत्रणेकडे केला होता. याची दखल घेत बेंगळूर येथील सीबीआय पथकाकडून 2023 पासून चौकशी सुरू आहे. मागील सहा महिन्यांपासून थंडावलेली चौकशी पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे.
कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांमध्ये घबराट
रविवारी बेंगळूर येथील सीबीआयचे एक पथक कॅन्टोन्मेंट बोर्डच्या गेस्ट हाऊस मध्ये दाखल झाले आहे. सहा महिन्यांपासून चौकशीचा ससेमिरा थांबल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेच्या नि:श्वास सोडला होता. परंतु चौकशीसाठी सीबीआयचे पथक पुन्हा दाखल झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. तपास यंत्रणांचे सीबीआय अधिकारी दाखल झाल्याची चर्चा दबक्या आवाजात मंगळवारी सुरू होती. अद्याप चौकशीला सुऊवात झाली नसली तरी बुधवारपासून चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे.
बेंगळूर येथे गुन्हे दाखल
मागील दोन वर्षांपासून सीबीआयकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. सुऊवातीला बेळगावमध्ये चौकशी झाल्यानंतर बेंगळूर येथे गुन्हे दाखल करण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी काही कर्मचाऱ्यांना बेंगलोर येथे बोलावून चौकशी केली होती.