कलंकासोबत जगू शकत नाही : केजरीवाल
मोदींसाठी 75 व्या वर्षी निवृत्ती का नाही असा विचारला प्रश्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे जाहीर सभा घेतली आहे. या सभेत बोलताना त्यांनी 2011 मध्ये झालेले अण्णा हजारे आंदोलन आणि पहिल्यांदा निवडणूक जिंकल्याच्या घटनेचा उल्लेख केला. आम्ही पहिल्याचवेळी प्रामाणिकपणाच्या बळावर सत्तेवर आलो असा दावा त्यांनी केला.सत्ता आणि पदाची मला लालसा नाही. भाजपने भ्रष्ट अन् चोर म्हटल्याने दु:ख झाले. कलंकासोबत खुर्ची का श्वासही घेऊ शकत नाही. जगू देखील शकू शकत नाही. आगामी दिल्ली निवडणूक माझी अग्निपरीक्षा असून प्रामाणिक वाटलो तरच लोकांनी मत द्यावे असे त्यांनी म्हटले आहे.
या सभेत केजरीवालांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना उद्देशून 5 प्रश्न उपस्थित केले. वयाच्या 75 व्या वर्षी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि कलराज मिश्र यासारख्या नेत्यांना निवृत्त केले मग हा नियम मोदींवर का लागू नाही? मोदींवर हा नियम लागू होणार नसल्याचे अमित शाह सांगत आहेत. यावर भागवत यांनीच स्पष्टीकरण द्यावे असे केजरीवालांनी म्हटले आहे.
दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी 13 सप्टेंबर रोजी जामिनावर बाहेर पडलेल्या केजरीवालांनी 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 21 सप्टेंबर रोजी आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री झाल्या होत्या.
प्रामाणिकपणाने निवडणूक लढविली जाऊ शकते आणि जिंकताही येते हे मलाही आजही आठवते. 4 एप्रिल 2011 रोजी स्वतंत्र भारतातील भ्रष्टाचार विरोधी सर्वात मोठे आंदोलन जंतर-मंतर येथूनच सुरू झाले होते. त्यावेळचे सरकार अहंकारी होत. निवडणूक जिंकून दाखवा असे आव्हान देत होते. आमच्याकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसे नव्हते. तरीही आम्ही निवडणूक लढविली आणि जनतेने विजयी केले. पहिल्याच वेळी आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाले. प्रामाणिकपणाने निवडणूक लढविली जाऊ शकते आणि विजयही मिळविता येतो हे आम्ही दाखवून दिले होते असा दावा केजरीवालांनी केला आहे.
देशाचे राजकारण बदलण्याचा होता उद्देश
दिल्लीत 10 वर्षांपासून आम्ही प्रामाणिकपणाने सरकार चालवत होते आणि जनतेचा पैसा वाचवत होते. षडयंत्र रचून आमच्या अनेक नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. आम्ही तुरुंगातून बाहेर आलो आणि त्यानंतरच मी राजीनामा दिला. मी भ्रष्टाचार करण्यासाठी राजकारणात आलो नव्हतो. मला मुख्यमंत्रिपदाची लालसा नाही. मी पैसे कमाविण्यासाठी राजकारणात आलो नव्हतो. देशासाठी, भारतमातेसाठी आणि देशाचे राजकारण बदलण्यासाठी आलो होता असा दावा केजरीवालांनी केला.
काहीच कमाविले नाही
आता मी शासकीय निवासस्थान सोडणार असून अनेक लोक स्वत:चे घर घ्या असे फोन करून सांगत आहेत. आम्ही पैसे स्वीकारणार नाही. पितृपक्ष संपल्यावर नवरात्रात मी घर सोडेन आणि लोकांदरम्यान येऊन राहणार आहे. जोपर्यत न्यायालय निर्दोष मुक्त करणार नाही तोपर्यंत पद न स्वीकारण्याचा विचार केला होता. परंतु वकिलांनी 8-10 वर्षे खटला चालणार असल्याचे सांगितले. मग जनतेच्या न्यायालयात जात मी प्रामाणिक असल्याचे सांगणार असल्याचे उद्गार केजरीवालांनी काढले आहेत.
आगामी निवडणूक अग्निपरीक्षा
आगामी दिल्ली निवडणूक सामान्य नसेल. तर माझी अग्निपरीक्षा पाहणारी असणार आहे. मी प्रामाणिक वाटलो तरच लोकांनी आमच्या पक्षाला मत द्यावे. ही झाडू आता निवडणूक चिन्ह नव्हे तर श्रद्धेचे प्रतीक आहे. जेव्हा एक व्यक्ती मतदान करण्यासाठी जातो आणि झाडूचे बटन दाबतो, तेव्हा डोळे बंद करून प्रथम देवाचे स्मरण करतो. प्रामाणिक सरकार स्थापन करण्यासाठी मतदान करत असल्याचा विचारकरतो. केजरीवाल चोर आहे का केजरीवालाला तुरुंगात पाठविणारे चोर आहेत हे आता लोकांनीच ठरवावे असे आप नेत्याने सभेला संबोधित करताना म्हटले आहे.