कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नाचता येईना

06:59 AM Oct 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मराठीत एक म्हण प्रचलित आहे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे जे सुरु आहे ते पाहता हीच म्हण लागू पडते. विज्ञान, तंत्रज्ञान यातील प्रगती नंतर माणसांचं जीवन आमुलाग्र बदललंय आणि रोज बदलताना दिसतंय. बदलांचा हा वेग प्रचंड आहे त्यामुळे ते समजून घेत असतानाच नवीन बदल झालेले असतात. आपण एखादा नवा करकरीत मोबाईल घेऊन घरी येतो तोवर त्याचे प्रो मॉडेल लॉंच झालेले असते, हा वेग असह्य असला तरी आपण अनुभवतो. संगणक, स्मार्टफोन, सोशलमीडिया, ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन मिटींग, सायबर गुन्हे, मोहात फसवून बॅंक खाते मोकळे करणे अशी अनेक बरी वाईट प्रकरणे रोज समोर येतात. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. येथील निवडणूका, देशाची घटना आणि लोकशाहीतील जनतेचा सहभाग नेहमीच कौतुकास्पद असतो. जनता कधी कुणाला घरी बसवेल आणि कुणाला डोक्यावर घेईल, याचा कुणालाच अंदाज लागत नाही. म्हणूनच निवडणुकीत चुरस असते आणि असली पाहिजे. काळानुरुप मतदान यंत्रणेत अधिक आधुनिकता, सहजता आणि गतीमानता आणली जाते. आपल्या देशातही मतदार नोंदणीपासून मतमोजणी पर्यंत ही आधुनिकता आणली गेली आहे पण निवडणुकीत जनतेने नाकारलेले उमेदवार आणि त्यांचे पक्ष निवडणूक यंत्रणेवर, मतदान यंत्रावर आणि आचार संहितेवर अपयशाचे खापर फोडतात आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशा प्रतिगामी मागण्या करताना दिसतात. आम्ही जिंकलो की निवडणूक यंत्रणा उत्तम आणि आम्ही पडलो तर यंत्रणा खराब, अशी भूमिका घेऊन मोर्चे, शिष्टमंडळे, आरोप सुरु होतात. ‘दोन माणसे आली होती. नावे माहीत नाहीत पण निवडणूक जिंकून देतो’ म्हणत होती अशा विनाधार वावड्या उठवल्या गेल्या. ते आपण सर्वांनी बघितले. आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दिवाळीनंतर सुरु होतील, असे दिसताच तोच ‘नाचता येईना’ चा प्रयोग पुन्हा सादर होताना दिसतो आहे. ठाकरे बंधू आणि शरद पवार, जयंत पाटील आदी महोदय त्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. या मंडळींचा जनमताच्या कौलावर विश्वास नसल्याचे ते द्योतक आहे. बुधवारी मुंबईत आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडी आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. आणि मतदार यादी दुरुस्त होत नाही तोवर निवडणूक नको अशी मागणी केली. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्यासमोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांतील घोळ,

Advertisement

व्हीव्हीपॅटचा वापर न करणे आणि बनावट मतदार नोंदणी यांसारख्या मुद्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत आणि व्हीव्हीपॅटशिवाय निवडणुका घेऊ नयेत. त्यांनी मतदार यादीत आढळणाऱ्या त्रुटी, जसे की एकाच मतदाराचे दोन ठिकाणी नाव असणे किंवा वडिलांचे वय मुलापेक्षा कमी दाखवणे, यावर चिंता व्यक्त केली. तर उद्धव ठाकरे यांनीही बनावट मतदार नोंदणीवर कारवाई न झाल्याबद्दल प्रश्न विचारले. यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये बूथ कॅप्चरिंग झाल्याचा आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध न करून दिल्याने भाजपने निवडणुका कशा जिंकल्या, यावर संशय व्यक्त केला. विरोधकांनी व्हीव्हीपॅट नसल्यास मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली. या सर्व प्रश्नांवर निवडणूक आयोगाने विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. तथापि या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागची पाच वर्षे झालेल्या नाहीत. याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो. आमची भेट झाल्यानंतर त्यांनी नोटिफिकेशन काढलं. त्यांनी आठ दिवसांची मुदत राजकीय पक्षांना दिली आहे. निवडणूक आयोग सहा, आठ महिने घेणार आम्ही आठ दिवसांत काय निर्णय घेणार? आम्ही नोटिफिकेशन रद्द करण्याची मागणी केली आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ते पाहून आम्ही पुढची भूमिका ठरवू असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Advertisement

एकुणात निवडणुका होतात की पुढे जातात हा प्रश्न निर्माण करण्यात आला आहे. लोकशाहीतील घटनात्मक महत्त्वाच्या पदावर आरोप करत प्रक्षोभ निर्माण केला जातो आहे का याकडे पाहिले पाहिजे. अनेक माणसांची गावाकडे आणि नोकरीकडे अशा दोन ठिकाणी नाव नोंदणी असते. वयाची आकडेवारी कमी जास्त असते पण हा आजचा प्रकार नाही, तो पंडित नेहरू यांच्या काळापासून सुरू आहे. पण बोटावर शाई लावली जाते. मतदान पेंद्रात उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. ते व्होट चॅलेंज करु शकतात. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांची एक जुनी वात्रटिका आहे त्यात एक मुलगा आपल्या बापाला विचारतो ‘बाबा काल घराशेजारी मतदान केंद्रावर येऊन मतदान करुन गेलात पण घरी का आला नाहीत’ यातील वास्तव समजून घेतले पाहिजे आणि कुठलेही बटण दाबा मतदान लालुलाच पडते असे म्हटले जायचे पण असं म्हणणे वेगळे आणि तसे मतदान पडणे वेगळे. लोकांना नको असलेले सरकार आणि उमेदवार लोक स्विकारतील का? हा मुलभूत प्रश्न आहे. असे काही चुकीचे झाले तर मोठा उठाव होईल. ओघानेच निवडणूक आधुनिक यंत्रणेला विरोध न करता लोकविश्वास प्राप्त केला पाहिजे, चुका कबूल करुन नव्या समुहांना सोबत घेऊन लोकविश्वास प्राप्त केला पाहिजे. निवडणुकीत साम, दाम, दंड सर्व आयुधं वापरली जातात पण रडीचा डाव खेळला जात नाही. महाराष्ट्रात तरी असा डाव खेळला जाऊ नये. आता काय निर्णय होतो ते बघुया. पण या प्रकरणाला नाचता येईना असेच म्हणावे लागेल.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article