रक्तात गांजा, मृत्यूचे गूढ कायम
गोमेकॉतील महिला इंटर्न डॉक्टरचे मृत्यू प्रकरण : अंतिम फॉरेन्सिक अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
पणजी : दोनापावला समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत आढळलेल्या महिला डॉक्टरच्या प्राथमिक टॉक्सिकोलॉजी (विषशास्त्र) चाचणीत तिच्या रक्तामध्ये ‘कॅनाबिस’ (गांजा) असल्याचे आढळून आल्याने या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे. तरीही केवळ या पदार्थाच्या अस्तित्वावरून या घटनेची संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होत नाही, असे तपासकर्त्यांनी नमूद केले आहे. वैज्ञानिक विश्लेषणातून अधिक स्पष्ट माहिती मिळेपर्यंत या प्रकरणाचे गूढ कायम राहिले आहे. दोनापावला समुद्रकिनाऱ्यावर जून महिन्याच्या सुऊवातीला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) एका 23 वर्षीय महिला इंटर्न डॉक्टरचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, पोलिस अंतिम फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहेत. या अहवालातूनच तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.
भूल देण्याचे औषध, इंजेक्शन सिरींग...
मूळची कलिकत केरळ येथील गौरी नारायणन आणि गोमेकॉमध्ये इंटर्नशिप करत असलेली ही डॉक्टर 10 जून रोजी मृत अवस्थेत आढळली होती. तिची इंटर्नशिप संपण्यासा केवळ दोन दिवस बाकी असताना ही घटना घडली होती. घटनास्थळी भूल देण्याचे औषध व इंजेक्शन सिरींग्ज सापडले होते. तेव्हापासून पोलिस तिच्या मृत्यूपूर्वीच्या हालचालींचा मागोवा घेत आहेत आणि घटनाक्रम समजून घेण्यासाठी उपलब्ध पुराव्यांची तपासणी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास सध्या केवळ तर्कवितर्कांवर अवलंबून न राहता फॉरेन्सिक पुराव्यांवर केंद्रित आहे. अधिकारी वेर्णा येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (वैज्ञानिक तपास प्रयोगशाळा) सविस्तर अहवालाची वाट पाहत आहेत.
अनेक साक्षिदारांच्या जबान्या नोंद
प्रयोगशाळेच्या अहवालाची वाट पाहत असतानाच पोलिसांनी या घटनेशी संबंधित अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरु ठेवले आहे. आवश्यकता भासल्यास अजूनही काही जणांच्या जबान्या नोंदविण्यात येणार आहेत.
पुराव्यांचे विश्लेषण सुरुच
त्याचबरोबर उपलब्ध पुराव्यांचे विश्लेषण करणे सुरू ठेवले आहे. फॉरेन्सिक तपासणीच्या निष्कर्षांवरच तपासाची पुढील दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल, असे सूत्रांनी सांगितले. अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याने, त्या तऊण डॉक्टरच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे वस्तुस्थिती स्पष्ट करण्यावर अधिकाऱ्यांचा भर आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पहिल्याच दिवशी सखोल आणि निष्पक्ष चौकशीचा आदेश दिला आहे. पणजी पोलिसस्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक सध्या मयत गौरीचे कॉल डिटेल्स, तिचे मित्रमैत्रिणी आणि गोमेकॉतील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवून घेत आहेत. प्राथमिक अहवालात अंमली पदार्थांचे अंश सापडल्यामुळे पोलिस आता अंमली पदार्थ विरोधी पथकाची मदत घेण्याचीही शक्यता आहे.
तपासातील महत्वाचे मुद्दे
मयत डॉक्टरच्या शरीरात ‘कॅनाबिस’ (गांजा) सह इतर काही पदार्थ होते का? हे पुढील अहवालातून स्पष्ट होईल आणि मृत्यूचे वैद्यकीय कारण निश्चित करण्यास मदत होईल. तपासकर्ते अनेक अनुत्तरित प्रश्नांचाही शोध घेत आहेत. ती महिला इंटर्न डॉक्टर त्या समुद्रकिनाऱ्यावर कशी पोहोचली? तिचा मृतदेह सापडण्यापूर्वी नेमके काय घडले? या गोष्टींचा समावेश आहे. ती डॉक्टर वैद्यकीय प्रयोगशाळेतील गणवेशात समुद्रकिनाऱ्यावर आढळल्याने या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे. कोणताही घातपात झाल्याची पुष्टी झालेली नाही, तरीही या टप्प्यावर तपासकर्त्यांनी कोणतीही शक्यता नाकारलेली नाही. शवचिकित्सा अहवालात तिच्या हातावर इंजेक्शन सुई टोचल्याची जखम दिसून आली होती. या जखमेचे नेमके कारण काय? याचाही तपास सुरु आहे. शेवटी तिचा मृत्यू अपघाती, वैद्यकीय, पर्यावरणीय किंवा इतर कारणांमुळे झाला आहे का? हे समजून घेण्यासाठी फॉरेन्सिकचा अंतिम अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरेल.