ऊस तोड बंद झाल्यामुळे पशुपालनात शेतकऱ्यांना येताहेत अडचणी
कोल्हापूरः विश्वनाथ मोरे
शेती या व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय समजला जातो. शासन दरबारी शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो हमीभाव मिळत नाही. शेतीवर मिळणारे पीक कर्ज हे अस्थिर तसेच महागाई जास्त झाल्यामुळे शेती व्यवसाय करणे दिवसेंदिवस अडचणीचे होत आहे. या व्यवसायाला पूरक पशुपालन या व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे. या व्यवसायामध्ये सुद्धा अनेक अडचणी आहेत. यामध्ये विशेष करून जनावरांना वेळेवर औषध उपचार, गाभण व भाकड काळ, पशुखाद्य यांचा वाढणारा व कमी होणारा दर या सर्व बाबींचा ताळमेळ घेऊन दूध व्यवसाय करणे तारेवरची कसरत होत आहे. यामध्ये आता आणखीन एका अडचणीची भर पडली आहे. ती म्हणजे जनावरांना मिळणारी वैरण. आता ऊस कारखाने बंद होत आहेत, त्यामुळे जनावरांना वैरणीचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेती व पशुपालन या व्यवसायाच्या समस्या संपता संपेना झाल्या आहेत.
तरुणांना रोजगार नाही, शेतकऱ्याला योग्य हमीभाव नाही, दूध वाढीसाठी जनावरांना वैरण नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधताना व सोडवताना शेतकरी हवालदिल झाला आहे.
समस्त जेष्ठ पशुपालन शेतकरी.
पूर्वी परंपरागत शेती करत असताना अदलाबदल करत पिके घेतली जात होती. त्यामुळे जनावरांना चारा मिळावा वैरणीचा तुटवडा होऊ नये या बाबींचा विशेष विचार केला जात होता.पण आता ऊस कारखानदारी जोरात सुरू झाल्यामुळे अदलाबदल पिके न घेता फक्त ऊस आणि ऊस या पिकावरच शेतकऱ्यांचा जास्त भर आहे.उसास एफ आर पी योग्य मिळावी यासाठी शेतकरी संघटनेकडून होणारे आंदोलन,कारखानदारांचा आडमुठेपणा या बाबीमुळे ऊस हंगाम लेट सुरू होतो.तसेच कारखानदारांची ऊस नेण्यासाठी आपापसात असणारी स्पर्धा यामुळे ऊस उत्पादक जिकडे लवकर तोडणी मिळेल तिकडे ऊस घालतो. पर्यायी सगळीकडेच ऊसतोड जास्त झाल्यामुळे वेळे अगोदरच कारखाना बंद होऊन वैरणीचा तुकडा निर्माण झाला आहे.
माझ्या दहा ते पंधरा गाई म्हशींचा गोठा असून योग्य ते नियोजन करून पशुपालन करत आहे.यावर्षी लवकरच ऊस कारखाने बंद झाल्याने वैरणीचा तुकडा निर्माण होत झाला आहे.पर्यायी हंगामानंतर लागणारी वैरण ही गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट रकमेने घेण्याची वेळ आली आहे.दुधाला मिळणारा भाव हा जेमतेमच असल्यामुळे त्यातून पशुखाद्य व इतर खर्च वजा जाता मिळणारे उत्पन्न याच्यासाठी रात्रंदिवस राबावे लागते.आता वैरणीचा तुटवडा झाल्यामुळे पशुपालन करणे खूप जिकरीचे काम झाले आहे.
अवधूत पाटील, दूध उत्पादक कोगे.