पदाधिकाऱ्यांना विचारूनच उमेदवारी दिली जाईल : खासदार तटकरे
सोलापुरातील संकल्प मेळावा उत्साहात पार
सोलापूर :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात सोमवारी दुपारी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार तटकरे यांनी पक्षाचे धोरण स्पष्ट केले.
खासदार तटकरे म्हणाले, "सध्या राज्यात महायुतीचे प्रबळ सरकार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न राहील. मात्र प्रत्येक जिल्ह्यात हेच समीकरण लागू राहील, असे निश्चितपणे सांगता येत नाही. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच उमेदवारी दिली जाईल, हे मी निश्चितपणे सांगतो."
या मेळाव्याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान, सचिव प्रमोद भोसले, माजी आमदार संजयमामा शिंदे, राजन पाटील, यशवंत माने, तसेच प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, तर शहराध्यक्ष संतोष पवार यांनी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याचा आढावा सादर केला.