बायोमेट्रीक, फेसरिडिंग करूनच उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश
कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवारी 10 रोजी महाटीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षा होत आहे. कोल्हापूर जिह्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फंत (प्राथमिक) घेण्यात येणारी ही 28 परीक्षा केंद्रावर होणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत पेपर क्रमांक-1 हा पेपर तर पेपर क्रमांक-2 हा पेपर दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत होईल. या दोन्ही पेपरसाठी सक्तीने बायोमेट्रीक, फेसरिडिंग कऊनच उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारातून आत सोडले जाईल. पेपर क्रमांक-1 हा पेपर देणाऱ्या उमेदवारांनी सकाळी साडे आठ वाजताच व पेपर क्रमांक-2 देणाऱ्या उमेदवारांनी दुपारी साडे बारा वाजताच परीक्षा केंद्रावर येणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शेंडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षक भरतीसाठी पात्र ठरवले जाणार आहेत, असे सांगून परीक्षा नियोजनाची अधिक माहिती देताना शेंडकर म्हणाल्या, पेपर क्रमांक-1 हा पेपर 6 हजार 103 तर पेपर क्रमांक-दोन हा पेपर देणारे 9 हजार 677 उमेदवार आहेत.
या सर्व उमेदवारांनी पेपरला येताना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावऊन डाऊनलोड केलेले मुळ प्रवेशपत्र आपल्या सोबत आणणे बंधनकारक आहे. पेपर क्रमांक-1 हा पेपर दिल्यानंतर पेपर क्रमांक-2 हा पेपर देणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा केंद्राच्या गेटच्या बाहेर जाऊन बायोमेट्रीक, फेसरिडिंग कऊनच पेपरसाठी केंद्रात प्रवेश करावा लागेल. जे कोणी असे करणार नाहीत, त्यांना पेपरला बसू दिले जाणार नाही. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर वॉच ठेवण्यासाठी सर्व 28 परीक्षा केंद्रांसह केंद्र संचालक कक्ष व कक्ष गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तसेच संपूर्ण परीक्षेच्या कामकाजाचे व्हीडीओ शुटिंगसुद्धा केले जाणार आहे. परीक्षा केंद्रांवरील कॅमेऱ्यांमधील फुटेज जिल्हा परीक्षा नियंत्रण कक्षामध्ये पाहण्याची व्यवस्था आहे. दोन्ही पेपर देणाऱ्या उमेदवाराला आपल्याजवळ मोबाईल, कॅलक्युलेटर, कॅमेरा, डिजीटल डायरी, नोस्ट ठेवता येणार नाही. तसे आढळल्यास भारतीय दंड संहितेनुसार व परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम 1982 नुसार कारवाईला सामोरे जावे लागले, असेही शेंडकर यांनी सांगितले.
सात उमेदवारांची आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये व्यवस्था
दादासाहेब मगदूम हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर रविवारी 10 रोजी फक्त 7 उमेदवार महाटीईटी परीक्षा देणार होते. मात्र काही कारणास्तव सातही उमेदवारांची मगदुम हायस्कूलऐवजी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये परीक्षा देण्याची व्यवस्था केली आहे. या बाबतची आवश्यक ती माहिती उमेदवारांना कळवण्यात आली आहे, असे शेंडकर यांनी सांगितले.