शेतकरी संघाच्या उमेदवारांनी प्रत्येकी १ लाख रुपये निवडणूक निधी द्यावा : विजयसिंह जाधव यांची मागणी
वारणानगर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात योगदान देणाऱ्या शेतकरी सहकारी संघ सध्या अडचणीतूंन वाटचाल करत आहे. संघाला निवडणुकीचा खर्च परवडणारा नाही. त्यामूळे शेतकरी संघाच्या निवडणुकीतील उमेदवारांनी प्रत्येकी १ लाख रुपये निवडणूक निधी म्हणून द्यावा अशी मागणी शेतकरी संघाचे माजी कर्मचारी व सभासद,वारणेचे ज्येष्ठ नेते विजयसिंह जाधव यांनी केली आहे.
सभासद- कर्मचाऱ्यांच्या वतीने पत्रकारांशी बोलताना श्री. जाधव यांनी दिलेली माहिती अशी --कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे. शेतकरी संघाची अडचणीत असताना निवडणूक जाहीर झाली. बिनविरोध व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न झाले परंतु त्यास यश आले नाही.यामूळे निवडणूक खर्चाला विनाकारण सामोरे जावे लागले आहे.
निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी तीस लाख रुपये भरावे लागणार आहेत. इंधन खरेदीसाठी जुळवाजुळव केलेल्या रक्कमेतून काही लाख रुपये निवडणूक खर्चासाठी दिल्याने पेट्रोल पंप बंद ठेवावे लागणार आहेत.शेतकरी संघ वाचवण्यासाठी निवडणूकीतील सर्वच उमेदवारांनी निवडणूक कार्यक्रमांसाठी प्रत्येकी एक लाख रुपये निवडणूक निधी म्हणून जमा संघाकडे करावा व पेट्रोल पंप बंद पडू नयेत याची काळजी घ्यावी. संघाला वाचविण्यासाठी निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक निधी उभा करावा अशीही मागणी सभासद व कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री.जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना केली.