उमेदवार गावांत अन् मतदार शेतात..
कोल्हापूर :
विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपआपल्या मतदार संघातील गावागावात, गल्ली बोळात प्रचाराचा धुमधडाका सुरू केलेला आहे. सध्या सुरू असलेली शेतीची कामे, काही ठिकाणी सुरू झालेली ऊसतोडणी त्यामुळे मजूरांची टंचाई अशा विविध करणामुळे शेतकऱ्यांना शेतात गेल्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे प्रचारासाठी गावात आलेल्या उमेदवारांना वयोवृद्धांशी संवाद साधावा लागत आहे. रात्री गावोगावी प्रचार सभा,कार्नर बैठका होत आहेत. परंतू या बैठकांना दिवसभर शेतात राबून आलेला शेतकरी, बाहेरगावी 12 तास काम करणारे मजूर फारशी हजेरी लावत नाही.
काही गावात सकाळी रॅली, प्रचारासाठी आलेल्या उमेदवारांसोबत माणसेच उपलब्ध नसल्याने प्रचाराची धार कमी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गावातील अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर फक्त राजकारणातून नोकरी मिळालेले मोजकेच तरूण आपल्या नेत्याचा डिपी, स्टेटस् ठेवून प्रचार करत आहेत.
मागील निवडणुकीपेक्षा यंदा युवा वर्ग या सर्वांपासून अलिप्त असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे गावात कोणत्याही नेत्याची सभा असू देत युवकांची हजेरी कमीच असल्याचे दिसते. आठ बारा, दोन - पाच हे शेतीकामांचे वेळापत्रक, संध्याकाळी गायी-म्हैंशींच्या धारा रोजच असल्याने महिलांना सभेला येण्यास वेळेच मिळत नाही. त्यामुळे सभेला गर्दी जमेलच अशी खात्री कोणत्याही नेत्यांना वाटत नाही.
शेतात जावून प्रचार
गावात शेतकरी मतदार उपस्थित नसल्याने अनेक उमेदवारांनी आपला प्रचाराचा ताफा थेट शेताच्या बांधाकडे वळविला असून त्याठिकाणी शेतात जावून ते मतदारांशी संवाद साधत आहेत. मात्र एक गेला की, दुसरा उमेदवार प्रचाराला येत असल्याने दिवसभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना उमेदवारांना टाळताही येत नाही अन् त्यांच्याशी चर्चा करण्यात वेळ गेला की पुन्हा शेतातील कामे थांबली, अशी स्थिती होत आहे.
गावपुढाऱ्यांची दमछाक
आपला नेता गावात येणार असल्याने यासाठी गाव पुढारी मतदारांच्या आतापासूनच साहेब येणार आहेत, आजच्या दिवस थांबा म्हणून विनंती करत आहेत. मात्र शेतीकामाची लगबग, कागल, कोल्हापूर येथे मोटरसायकलवरून ये जा करणारे कर्मचारी यांना वेळच मिळत नसल्याने सोबत असलेले चार दोन कार्यकर्ते व वयोवृद्धांशी संवाद साधावा लागत आहे.