उमेदवारांचे भवितव्य आज सीलबंद
जिल्हा पंचायत निवडणुकीची तयारी पूर्ण : आज सकाळपासून मतदानास होणार प्रारंभ
पणजी : उत्तर व दक्षिण गोवा या दोन जिल्हा पंचायतींच्या 50 मतदारसंघांसाठी आज दि. 20 रोजी होणाऱ्या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा लागल्या असून 226 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद होणार आहे. मतपत्रिकेच्या माध्यमातून होणाऱ्या या निवडणुकीत 226 उमेदवार नशीब आजमावत असून त्यांच्यासाठी 8,69,356 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये उत्तरेतून 111 आणि दक्षिणेतून 115 जणांचा समावेश आहे. त्यात भाजप व मगो युतीचे सर्वाधिक 43 उमेदवार आहेत. सोमवारी दि. 22 रोजी मतमोजणी होऊन त्यांच्या नशिबाचा फैसला होणार आहे.
18 मतदारसंघ महिलांसाठी राखीव
उत्तरेतील हरमल, मोरजी, कोलवाळ, कळंगुट, रेईश मागूश, सांताक्रूझ, चिंबल, सेंट लॉरेन्स व मये तर दक्षिणेतील उसगाव-गांजे, वेलिंग-प्रियोळ, बोरी, शिरोडा, नावेली, रिवण, बार्शे, खोला, कुठ्ठाळी मिळून 18 मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत. यंदा उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपद आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्षपद महिलांसाठी राखीव असणार आहे. त्यासंबंधी नुकतीच आरक्षण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दोन्ही जिल्हा पंचायतीत प्रत्येकी 9 मतदारसंघ महिलांसाठी राखीव असून भाजपबरोबरच काँग्रेस, आप, आरजी, गोवा फॉरवर्ड आणि मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राज्यात पाळी आणि कवळे या दोन मतदारसंघांमध्ये प्रत्येकी दोन उमेदवार आमने सामने असून तेथील लढत अटीतटीची होणार आहे.
सर्वाधिक 8 उमेदवार सांकवाळमध्ये आहेत तर अन्यत्र 3 ते 7 असे उमेदवार आहेत.मतदानाला 48 तास शिल्लक असताना गुऊवारी सकाळी प्रचार समाप्ती झाली. त्यानंतर प्रत्येक मतदाराने अप्रत्यक्ष आणि स्वतंत्र प्रचारावर भर दिल्याचे दिसून आले. राज्यात पंचायत, जिल्हा पंचायत, पालिका, विधानसभा आणि लोकसभा अशा स्तरांवर पाच प्रकारे निवडणूक होत असली तरी हल्लीच्या काही वर्षांमध्ये भाजप प्रत्येक निवडणूक एकसमान दर्जाची आणि प्रतिष्ठेची मानून त्यात स्वत:ला झोकून देत असते. अन्य विरोधी पक्षही आपापल्या परीने बलाढ्या उमेदवाराला टक्कर देण्याचे प्रयत्न करत असतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्व मंत्री, तसेच सत्ताधारी आणि विरोधी आमदार, प्रत्येक पक्षाचे नेते, काहींचे राष्ट्रीय स्तरावरील नेते यांनी आपआपल्या भागात व आपापल्या उमेदवारासाठी प्रचारात सहभाग घेतला होता.
