जगज्जेत्याचा आव्हानवीर ठरविणारी कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा आजपासून
पुरुष गटात आर. प्रज्ञानंद, डी. गुकेश, विदित गुजराथी, तर महिला विभागात कोनेरू हंपी, वैशालीचा समावेश
वृत्तसंस्था/ टोरँटो
आगामी जागतिक अजिंक्यपद सामन्यातील आव्हानवीर कोण असेल ते ठरवण्यासाठी आज बुधवारपासून येथ कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा सुरू होणार असून यात तीन भारतीय स्पर्धक खेळणार आहेत. त्यापैकी किशोरवयीन आर. प्रज्ञानंदकडे जेतेपदाच्या दावेदारांपैकी एक म्हणून पाहिले जात आहे. सुमारे 35 वर्षांनंतर प्रज्ञानंद, डी. गुकेश आणि विदित गुजराथी यांच्या रुपाने तीन भारतीय वर्षातील या सर्वांत प्रतिष्ठित स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेत फक्त आठ स्पर्धकांचा समावेश असतो.
एका तज्ञाच्या मते, भारत हा बुद्धिबळ विश्वातील नवा रशिया आहे, कारण पूर्वी असे वर्चस्व फक्त रशियन खेळाडूंनी दाखवलेले आहे. निर्भय आणि मानसिकदृष्ट्या सक्षम प्रज्ञानंदला या स्पर्धेसाठी आठ वेळचा रशियन विजेता पीटर स्विडलरची मदत मिळण्याची शक्यता आहे. स्विडलरची साथ ही गेम चेंजर ठरू शकत असली, तरी या स्पर्धेतील वाटचाल मुख्यत्वे प्रज्ञानंदच्या फॉर्मवर आणि या कठीण स्पर्धेशी तो कसा जुळवून घेतो त्यावर अवलंबून असेल. या स्पर्धेत आठ खेळाडू एकमेकांशी दोनदा खेळतील.
अवघ्या 17 वर्षांचा गुकेश हा बॉबी फिशरनंतर या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला सर्वांत तऊण स्पर्धक ठरला आहे आणि जर गुकेशने ही स्पर्धा जिंकली, तर तो जागतिक अज्ंिांक्यपदासाठीच्या स्पर्धेत उतरणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरेल. विदित गुजराथीची वाटचालही बरीचशी त्याच्या फॉर्मवर अवलंबून असेल. मागील स्पर्धेत म्हणजे प्राग मास्टर्समध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि रेटिंगच्या यादीतही तो बराच घसरला होता. कँडिडेट्स स्पर्धेची पहिली फेरी भारतीय वेळेनुसार गुऊवारी मध्यरात्री सुरू होईल. त्यात एकूण चार विश्रांतीचे दिवस असतील. विजेत्याला केवळ जागतिक विजेतेपदासाठीची लढत खेळायला मिळणार नाही, तर त्याला 48000 युरोचे (अंदाजे ऊ. 45 लाख) इनामही प्राप्त होईल.
दुसरीकडे, टोरँटो, कॅनडा येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर कोनेरू हंपी भारतीय आव्हानाचे नेतृत्व करेल. रशियाची ग्रँडमास्टर अलेक्झांड्रा गोर्याचकिना ही जेतेपदाची सर्वांत सशक्त दावेदार मानली जात असून माजी महिला विश्वविजेती चीनची लेई टिंगजी तिच्या मागोमाग दुसऱ्या स्थानावर आहे. हम्पीसह उर्वरित सहा स्पर्धकांविरुद्ध या दोन खेळाडूंची कामगिरी कशी होते त्यावर बरेच काही अवलंबून असेल. या स्पर्धेत हम्पीकडे सारे लक्ष राहणार असले, तरी आर. वैशालीचे महत्त्वही नाकारता येणार नाही. शेवटपर्यंत लढण्याच्या आणि तडजोड न करण्याच्या वेगळ्या शैलीमुळे वैशाली लक्षणीय ठरली आहे.