उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांना गरिबांची काळजी नाही
शिरवाड येथील काँग्रेस पक्षाच्या प्रचारसभेत माजी केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांची टीका
कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या डोळ्यात अश्रू नाहीत आणि गरिबांबद्दल काळजी नाही, असा टोला माजी केंद्रीय मंत्री आणि कारवारच्या खासदार मार्गारेट अल्वा यांनी लगावला. आज बुधवारी कारवार तालुक्यातील बंगारप्पानगर शिरवाड येथे काँग्रेस पक्षाच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. अल्वा पुढे म्हणाल्या, भाजपचे उमेदवार हेगडे विधानसभा अध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करलेले हेगडे आता लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. बेंगळुरात जिल्ह्यातील वन अतिक्रमण शेतकऱ्यांनी संपूर्ण दिवस उन्हात आंदोलन छेडले. तरी विधानसभा अध्यक्षानी विधानसभेपासून एक किलो मीटर अंतरावरील शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची साधी चौकशी केली नाही. आता तेच माजी विधानसभा अध्यक्ष मतयाचना करीत आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या वेळी मदतीला न धावून आलेल्या भाजप उमेदवाराला तुम्ही मतदान करणार का? असा प्रश्न मार्गारेट अल्वा यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारी मालमत्तेची विक्री करायची आणि ती मालमत्ता अदानी, अंबानी यांनी खरेदी करायची एवढेच आज देशात चालले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात असताना जनतेकडून कर गोळा करून सार्वजनिक आस्थापने सुरू करण्यात आली होती. आताचे सरकार वातानुकूलीत खोलीत बसून सरकारी आस्थापनांचा विक्रीचा व्यवसाय करीत आहेत, असा आरोप अल्वा यांनी केला. इस बार चारसौ पार असा नारा भाजपवाल्यांकडून दिला जात आहे. 400 खासदारांचा आकडा त्यांना देशाचा संविधान बदलण्यासाठी हवा आहे. देशात शांती नांदायची झाल्यास, प्रेमाचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करायचे झाल्यास काँग्रेसची सत्ता आली पाहिजे, असे अल्वा आपल्या भाषणात म्हणाल्या.
काँग्रेसचा बालेकिल्ला
याप्रसंगी बोलताना इंधनमंत्री के. जे. जॉर्ज म्हणाले, कारवार लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने आंदोलन छेडले असताना भाजपचा जन्मही झाला नव्हता. पंतप्रधान मोदी नेहमीच सबका साथ, सबका विकास असे म्हणत असतात. तथापी ते कृती मात्र वेगळीच करीत आहेत. भाजपवाले निष्ठांवत नाहीत. भारतीयांच्या कष्टाची भाजपवाल्याना जाण नाही, अशी टीका केली. याप्रसंगी हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे, काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर, कारवारचे आमदार सतीश सैल यांनी काँग्रेस उमेदवाराला लोकसभेवर पाठविण्याचे आवाहन केले. यावेळी माजी मंत्री रमानाथ रै, निवेदित अल्वा, निकेतराज मौर्य, प्रभाकर म्हाळसेकर, जी. पी. नायक, शंभु शेट्टी, समीर नाईक आदी उपस्थित होते.