हॅचरी फार्मला दिलेले ना हरकत पत्र रद्द करा
कौलापूरवाडावासियांची मागणी : तालुका पंचायत अधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर : कौलापूरवाडा येथे क्वॉलिटी अनिमल फिड्स प्रा. लि.यांच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या पोल्ट्री फार्म तसेच नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या हॅचरी प्रकल्पाला बैलूर ग्राम पंचायतीच्या अधिकाऱ्यांना विना हरकत पत्र हे पंचायत सदस्यांच्या निदर्शनास न आणता देण्यात आलेले आहे. ते रद्दबातल करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांना कौलापूरवाडा वासियांच्यावतीने नुकतेच देण्यात आले.
ग्रा. पं. अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे
तालुक्यातील बैलूर ग्राम पंचायत क्षेत्रातील कौलापूरवाडा येथे हॅचरी प्रकल्प राबवण्यात येत आहे. या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून पोल्ट्री सुरू होती. त्यामुळे कौलापूरवाडा वासियांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या विरोधात कौलापूरवाडावासियांनी अनेकवेळा आंदोलन छेडून वरिष्ठ पातळीपर्यंत पोल्ट्री बंद करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली होती. या ठिकाणची पोल्ट्री बंद करून या ठिकाणी अद्ययावत हॅचरी प्रकल्प राबवण्यात येत आहे. या विरोधातही कौलापूरवाडा वासियांनी वरिष्ठ पातळीपर्यंत विरोध केला आहे. नुकताच पर्यावरण अधिकाऱ्यांनी कौलापूरवाडा येथील हॅचरी प्रकल्पाला भेट देवून पाहणी केली असता या ठिकाणी बैलूर ग्राम पंचायतीकडून या प्रकल्पाला ना हरकत पत्र देण्यात आले आहे.
मात्र याबाबत कौलापूरवाडा येथील ग्रा. पं.सदस्य सखुबाई पाटील आणि कौलापूरवाडा वासियांना याबाबतची माहिती देण्यात आली नाही. मात्र उच्च अधिकाऱ्यांनी ग्राम पंचायतीचे विना हरकत पत्र दाखवल्यानंतर कौलापूरवाडा वासियांनी बैलूर ग्राम पंचायतीला भेट देवून ग्रा. पं. अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र याबाबत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. जर हे प्रमाणपत्र रद्द केले नसल्यास उग्र आंदोलनाच्या इशाऱ्याचे निवेदन तालुका पंचायत अधिकाऱ्यांना कौलापूरवाडा वासियांनी दिले आहे. या विरोधात हरित लवाद, प्रदूषण मंडळसह इतर ठिकाणी कौलापूरवाडा वासियांनी दाद मागितलेली आहे. हा प्रकल्प राबवताना किमान पाचशे मीटर अंतरावर मानववस्ती राहू नये, असे निर्देश असताना कौलापूर गावालगतच हा प्रकल्प राबवण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.