For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : अघोरी नृत्याचा कार्यक्रम तातडीने रद्द करा; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

06:26 PM Feb 18, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   अघोरी नृत्याचा कार्यक्रम तातडीने रद्द करा  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी
Advertisement

                                  सातारा नगर परिषदेत शिवजयंतीत अघोरी नृत्याचा कार्यक्रम

Advertisement

सातारा - सातारा नगर परिषद मार्फत शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘अघोरी नृत्य’ या सादरीकरणाचा समावेश करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. हा कार्यक्रम तातडीने रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आली आहे.

समितीचे कार्याध्यक्ष डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही मागणी केली. त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे विज्ञाननिष्ठ आणि प्रगतिशील विचारांचे होते. त्यांनी अनेक लढाया अमावस्येच्या रात्री सुरू केल्या तसेच मुहूर्त-शकुन यांचा विचार न करता राज्यकारभार केला. अशा विज्ञानवादी परंपरेची आठवण साजरी करताना अघोरी स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे हे काळाची पावले मागे नेणारे आहे.या संदर्भात साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी नगर परिषदेला तातडीने सूचना द्याव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. महाराजांच्या विज्ञानवादी वारशाला गालबोट लागू नये, यासाठी त्वरित पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

समितीने निवेदनात नमूद केले आहे की, सातारा जिल्हा हा अंनिसच्या कार्याचा महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या चळवळीने राज्यासह देशभरात कार्य विस्तारले. त्यांच्या बलिदानानंतर राज्यात अघोरी आणि अमानुष प्रथांविरोधात कायदा करण्यात आला. त्यांच्याच नावाने सातारा नगर परिषद पुरस्कार देते, अशा पार्श्वभूमीवर अघोरी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करणे लांछनास्पद असल्याचे समितीने म्हटले आहे.

सातारा जिल्ह्याला संत व समाजसुधारकांचा समृद्ध वारसा लाभला असून, संत तुकाराम महाराज ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक प्रथांविरोधात भूमिका घेतली होती, असेही निवेदनात नमूद आहे.ही मागणीपत्रिका अंनिसतर्फे उदय चव्हाण, दीपक माने, वंदना माने, भगवान रणदिवे आणि शंकर कणसे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.