कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द करा
कोल्हापूर :
इंद्रजित सावंत यांना धमकी देवून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या अटकेसाठी जुना राजवाडा पोलिसांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. कोरटकर याला जिल्हा न्यायालयाने दिलेला अंतरिम जामीन रद्द करावा अशी मागणी गुरुवारी सरकारी वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात केली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत नागपूर येथील प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती. याप्रकरणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि नागपुरातील बेलतरोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच कोरटकर गायब झाला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथके नागपूरला गेली होती. मात्र, त्याने कोल्हापूर जिल्हा न्यायालयात धाव घेऊन 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मिळवला. त्याचा जामीन रद्द व्हावा यासाठी जिल्हा पोलिसांनी पोलिस महासंचालक कार्यालयाशी संपर्क साधून सरकारी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्याची परवानगी मिळवली. त्यानुसार गुरुवारी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून त्याचा अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी केली. न्यायाधीशांनी अर्ज दाखल करून घेतला असून, पुढील सुनावणीची तारीख लवकरच कळेल, असे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.
- दोन्ही मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये
नागपूर पोलिसांनी बुधवारी कोरटकरचा मोबाइल जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. त्यातील कोरटकर आणि इतिहास संशोधक सावंत यांच्या संभाषणातील आवाजाची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी कोरटकरचा मोबाइल कसबा बावडा येथील फॉरेन्सिक लॅबकडे देण्यात आला. इंद्रजीत सावंत यांचा मोबाइल गेल्या आठवड्यातच फॉरेन्सिक अधिका-यांना दिला आहे. दोन्ही मोबाइलमधील आवाजाची पडताळणी करून एकत्रित अहवाल मिळण्याची शक्यता आहे.