हलगा-मच्छे बायपास त्वरित रद्द करा
शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव परिसरात बेकायदेशीररित्या हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून सुपीक जमिनीमधून रस्ता केला जात आहे. तीन पिके येणाऱ्या 160 एकर जमिनीवर बेकायदेशीररित्या कब्जा करत रस्त्याचे काम केले जात असून यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळे हलगा-मच्छे बायपास रद्द करावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटना व हरित सेनेच्यावतीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे करण्यात आली.
गुरुवारी शेतकरी संघटनेचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी विधिमंडळात गेले होते. यावेळी त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या. पोलिसांच्या मदतीने शेतकऱ्यांवर दादागिरी करत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. झिरो पॉईंट चुकीच्या पद्धतीने दाखवून दिशाभूल करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम बंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
बळ्ळारी नाल्याचा विकास करा
येळ्ळूर रोडपासून हुदलीपर्यंत बळ्ळारी नाला वाहतो. पावसाळ्यात नाला भरून सांडपाणी शेतीमध्ये शिरत आहे. त्यामुळे परिसरातील शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान होत आहे. बळ्ळारी नाल्यातील गाळ काढण्यात न आल्यामुळे पाणी तेथेच साचून राहत आहे. त्यामुळे या नाल्यातील गाळ काढून नाल्याचा विकास करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी (गुरुजी), प्रकाश नाईक यांच्यासह शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या मागणीचे निवेदन तालुका प्रमुख राजू मरवे यांनी संघटनेकडे दिले होते.