धोमच्या डाव्या कालव्याला पांडे येथे पडले भगदाड; झोपलेल्या ऊसतोड मजूरांचा संसार गेला वाहून
चंद्रभागा ओढ्याला पूरदोन बैलांचा शोध सुरू; प्रशासनाची घटनास्थळी धाव
सातारा प्रतिनिधी
वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेला आहे. दोन बैलांची शोध मोहीम सुरू असून 12 बैल वाचवण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता पोहचले. ऊसतोड मजुरांना मदत प्रशासनाकडून सुरू होती. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
आधीच दुष्काळ जिल्ह्यात आहे. पाऊस कमी झाल्याने खटाव- माण सह जिल्ह्यातील जनता पाणी पाणी करू लागली आहे. दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी वाई तालुक्यातील धोम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले गेले आहे. त्याच कालव्याला पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजता भगदाड पडले. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले. शेतीचे नुकसान करत हे पाणी ओढ्यात घुसले. दिवसभर ऊस तोड करून झोपलेल्या ऊसतोड मुजरांच्या दीडशे झोपडयात पाणी शिरले. त्यांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. 12 बैल वाचवण्यात यश आले. दोन बैल बेपत्ता झाले असून याची शोध मोहीम सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच वाईचे प्रांत राजेंद्रकुमार जाधव, भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाने ऊस तोड मजूराना सुरक्षित स्थळी हलवले असून कोणतीही जीवित हानी झाली नाही.