For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनडाच्या पंतप्रधानांचे ‘मिशन इंडिया’ सुरू

06:57 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅनडाच्या पंतप्रधानांचे ‘मिशन इंडिया’ सुरू
Advertisement

पंतप्रधानांशी चर्चा : मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यात द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भर

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई, नवी दिल्ली

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी शुक्रवारी चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले. या दौऱ्यात त्यांच्या पत्नी डायना फॉक्स यासुद्धा त्यांच्यासमवेत  पहिल्याच भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भेटीचा प्राथमिक उद्देश मागील जस्टिन ट्रुडो सरकारच्या काळात वाढलेल्या दोन्ही देशांमधील तणाव दूर करणे आणि व्यापारी संबंधांना नवीन उंचीवर नेणे हा आहे. हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येनंतर भारत-कॅनडा संबंध बिघडले होते, परंतु आता ते सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या कॅनडाचे अमेरिकेशी संबंध चढ-उतारांचा काळ अनुभवत असतानाच कार्नी यांचा भारत दौरा होत आहे.

Advertisement

पंतप्रधान कार्नी आर्थिक राजधानी मुंबई येथे आपला दौरा सुरू करत असून ते उद्योजक-व्यापारी प्रतिनिधींना भेटणार आहेत. दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारी मजबूत करण्यावर ते चर्चा करतील. त्यानंतर ते 1 मार्च रोजी दिल्लीला रवाना होणार असून ते सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतील. या भेटीदरम्यान द्विपक्षीय बैठक देखील होईल. कॅनडाचे पंतप्रधान भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतील. तसेच भारत-कॅनडा सीईओ फोरमला संबोधित करतील.

2023 च्या दरम्यान शीख फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंधांमध्ये लक्षणीय बिघाड झाला होता. तत्कालीन ट्रुडो सरकारने भारतावर गंभीर आरोप केले होते. भारताने सातत्याने आरोप नाकारले असले तरी, परिस्थिती इतकी बिकट झाली की दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावले होते. तूर्तास हे संबंध स्थिर करण्याचा प्रयत्न मार्क कार्नी यांच्याकडून होणार आहे.

भारताने अलिकडच्या काही महिन्यांत युरोपियन युनियन, ब्राझील आणि फ्रान्ससह अनेक प्रमुख जागतिक शक्तींसोबत उच्चस्तरीय राजनैतिक प्रगती केली असतानाच कार्नी भारत दौऱ्यावर दाखल झाले आहेत. या भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना बळकटी मिळू शकते. दोन्ही पंतप्रधान 2 मार्च रोजी हैदराबाद हाऊस येथे उच्चस्तरीय चर्चा करणार असून त्यामध्ये ऊर्जा, दुर्मीळ खनिजे, शेती, शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम यासारख्या विषयांचा समावेश असेल. प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर समन्वय राखण्यावरही भर दिला जाईल.

भारताला कोणते फायदे मिळणार

मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याकडे राजनैतिक पुनर्संतुलन आणि आर्थिक भागीदारीतील एक नवीन अध्याय म्हणून पाहिले जात आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार करारावरील वाटाघाटी पुढील आठवड्यात सुरू होऊ शकतात. वाणिज्य मंत्रालयाच्या मते, दोन्ही देश मुक्त व्यापार कराराच्या अटी अंतिम करतील आणि लवकरच वाटाघाटी सुरू करतील अशी अपेक्षा आहे. भारत-कॅनडा व्यापक आर्थिक भागीदारी करारावरील वाटाघाटी गेल्या दशकापासून सुरू असल्या तरी बिघडत्या संबंधांमुळे 2023 मध्ये त्या थांबल्या होत्या. या भेटीमुळे मुक्त व्यापार कराराची अधिकृत सुरुवात होण्याची आणि त्याची व्याप्ती अंतिम होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.