कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंचा राजीनामा
खासदारांच्या वाढत्या दबावानंतर घेतला निर्णय
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारवर आणि वैयक्तिक पातळीवर टीका होत असल्याने सोमवारी रात्री त्यांनी हा निर्णय जाहीर केला. ट्रुडो यांनी राष्ट्राला उद्देशून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. ‘नव्या नेत्याची निवड केल्यानंतर पक्षाचा नेता आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा माझा मानस आहे,’ अशी घोषणा त्यांनी केली. तसेच आपल्या लिबरल पक्षाच्या अध्यक्षांना नवीन नेता निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासही सांगितले आहे. पुढचा नेता निवडून येईपर्यंत ते कार्यवाहक पंतप्रधान राहतील.
जस्टिन ट्रुडो 11 वर्षे लिबरल पक्षाचे नेते आणि नऊ वर्षे कॅनडाचे पंतप्रधान होते. 2015 मध्ये वयाच्या 44 व्या वर्षी ते पहिल्यांदा कॅनडाचे पंतप्रधान झाले होते. त्यानंतर 2019 मध्येही त्यांचा पक्ष सत्तेत आल्यानंतर पुन्हा पंतप्रधान बनले. मात्र, त्यांची लोकप्रियता घटली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव टाकला जात होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपासून ते महत्त्वाच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आणि जनमत चाचण्यांपर्यंत अनेक संकटांचा त्यांना सामना करावा लागला. तसेच विरोधी पक्षही सातत्याने ट्रुडो यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. अलिकडच्या काही महिन्यांत कॅनडामध्ये राजकीय उलथापालथ सुरू आहे. यापूर्वी 16 डिसेंबर रोजी माजी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची घोषणा केली होती.
खासदारांनी केली राजीनाम्याची मागणी
ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाची बुधवारी बैठक होणार आहे. तत्पूर्वीच खासदारांनी त्यांना राजीनामा देण्याचे आवाहन केले होते. खासदार 27 जानेवारी रोजी ओटावा येथे परतणार आहेत. तीनही प्रमुख विरोधी पक्षांनी ट्रुडो यांचे सरकार पाडण्याची योजना आखली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाढत्या दबावामुळे अखेर ट्रुडो यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.