कॅनडाचे नवे पंतप्रधान आज शपथबद्ध होणार
मार्क कर्नी 24 वे पंतप्रधान : मंत्रीही शपथ घेणार
वृत्तसंस्था/ओटावा
कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कर्नी यांचा शपथविधी समारंभ आज म्हणजेच शुक्रवार, 14 मार्च रोजी होणार आहे. ते कॅनडाचे 24 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. मार्क कर्नी हे कॅनडाचे विद्यमान पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची जागा घेतील. नवनियुक्त पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 वाजता राजधानी ओटावा येथील रिडो हॉलमध्ये होईल. कर्नी यांच्याव्यतिरिक्त त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सदस्यही शुक्रवारी शपथ घेतील. 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या लिबरल पक्षाच्या नेत्याच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. कर्नी यांना 85.9 टक्के मते मिळाली होती. पक्षनेत्याची निवडणूक जिंकल्यानंतर कर्नी यांनी पंतप्रधान ट्रुडो यांची भेट घेतल्यानंतर दोघांमध्ये सत्ता हस्तांतरणाबाबत चर्चा झाली. जानेवारीमध्ये ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. आता शुक्रवारी शपथविधी सोहळ्यापूर्वी ट्रुडो गव्हर्नर जनरल यांची भेट घेत अधिकृतपणे राजीनामा सादर करतील.