निज्जर प्रकरणी कॅनडाची पुन्हा कोलांटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध नसल्याची कबुली
वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडात हत्या झालेला खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या प्रकरणात कॅनडाच्या सरकारने उलटसुलट विधाने करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. निज्जर याची हत्या होणार आहे, अशी माहिती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती. तसेच भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही असे घडणार, हे आधीच माहीत होते, असे प्रतिपादन एका कॅनेडियन वृत्तपत्रात करण्यात आले होते. तथापि, या संबंधातील कोणताही पुरावा आमच्याकडे नसून वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार आहे, असे कॅनडाचे नेते जस्टीन ट्रूडो यांनी स्पष्ट केले आहे.
कॅनडातील या हत्या प्रकरणात भारत सरकारच्या नेत्यांचा हात आहे, असा आरोप यापूर्वी कॅनडाने अनेकदा केला आहे. भारताने या आरोपाचा स्पष्टपणे इन्कार केला असून कॅनडाला पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. तथापि, आतापर्यंत या आरोपाला पुष्टी देणारा एकही पुरावा कॅनडाने समोर आणलेला नाही. त्यामुळे या देशाचे आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत, हे स्पष्ट होते, अशी टीका भारताने केली होती. त्यानंतर भारताचा हात या प्रकरणात असल्याचा पुरावा नाही, अशी कबुली कॅनडाचे नेते जस्टीन ट्रूडो यांनी दिली होती.
वृत्तपत्रातील वृत्त काय होते...
कॅनडातील ‘ग्लोब अँड मेल’ या वृत्तपत्रात काही दिवसांपूर्वी एक खळबळजनक वृत्तांत प्रसिद्ध झाला होता. हरदीपसिंग निज्जर याची हत्या होणार असल्याची माहिती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे विदेश व्यवहार मंत्री जयशंकर आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना होती, असा आरोप या वृत्तात करण्यात आला होता. भारताने हे वृत्त अतिशय धारदार शब्दांमध्ये फेटाळले होते. कॅनडात भारताविरोधात कारस्थान रचले जात आहे. भारताची अवमानना करण्याचे अभियान कॅनडातील वृत्तपत्रांच्या माध्यमातून होत आहे. कॅनडा सरकारने अशा माध्यमांविरोधात कठोर कारवाई केली नाही, तर दोन्ही देशांमधील संबंध अधिकच बिघडतील, असा इशारा भारताकडून देण्यात आला होता.
इशाऱ्यानंतर स्पष्टीकरण
भारताने निर्वाणीची भूमिका घेतल्यानंतर कॅनडाचे नेते ट्रूडो यांनी पुन्हा नवे स्पष्टीकरण दिले आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असून ते केवळ अनुमानांवर आधारित आहे. हे वृत्त कॅनडा सरकारकडून देण्यात आले नसून त्याच्याशी आमच्या सरकारचा काहीही संबंध नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.