Canada Narcotics action| कॅनडात 1,160 कोटींचे अमली पदार्थ जप्त 13 पंजाबींसह 21 जणांना अटक
► वृत्तसंस्था ओटावा, जालंधर
कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात सीमेपलीकडे कार्यरत असलेल्या एका मोठ्या अवैध अमली पदार्थ तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. कॅनडा बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सीने 1.7 टन अवैध अमली पदार्थ जप्त केले आहेत. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 1 हजार 160 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. या माध्यमातून कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांनी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा केला जात आहे.
‘प्रोजेक्ट बे’ नावाच्या या विशेष मोहिमेअंतर्गत, पोलिसांनी विंडसर, लासेल, कॉर्नर, ब्रॅम्प्टन, मार्खम आणि कॅलेडॉनसह ओंटारियोच्या विविध भागांतील 22 ठिकाणी छापे टाकत भारतीय वंशाच्या अनेक ट्रक चालकांसह 21 संशयितांना अटक केली. कारवाई केलेल्या संशयितांपैकी 13 जण भारतातील पंजाबी वंशाचे तर उर्वरित 8 जण इतर देशांमधील असल्याचे सांगितले जाते.
या कारवाईदरम्यान अंदाजे 973 किलोग्रॅम कोकेन, 660 किलोग्रॅम मेथाम्फेटामाइन आणि 49 किलोग्रॅम अफू जप्त करण्यात आले. तपासादरम्यान, अधिक्रायांनी 230 ऑक्सिकोडोन गोळ्या, 17 अग्निशस्त्रs, मोठ्या प्रमाणात दारुगोळा, प्रतिबंधित शस्त्रs आणि संबंधित उपकरणे देखील जप्त केली. त्याव्यतिरिक्त मौल्यवान दागिने, नोटा मोजण्याची यंत्रे, 43 मोबाईल फोन, सहा लॅपटॉप, अंदाजे 80,000 कॅनेडियन डॉलर्स आणि 10,000 अमेरिकन डॉलर्स रोख रक्कम देखील जप्त केली. कथित गुह्यांशी संबंधित एक वाहनही जप्त करण्यात आले आहे.
या तपासाच्या आंतरराष्ट्रीय पैलूमध्ये अनेक अमेरिकी संस्थांनीही मदत केली. त्ज्यात होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन्स आणि यूएस ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन यांचा समावेश आहे. या कथित अमली पदार्थ तस्करीच्या ऑपरेशनच्या संबंधात अनेक व्यक्तींविरुद्ध आरोप दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी ‘प्रोजेक्ट बे’चे वर्णन व्यावसायिक वाहतूक मार्गांद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये कथितरित्या सामील असलेल्या एका संघटित गुन्हेगारी नेटवर्कवरील मोठी कारवाई असे केले आहे.
याप्रकरणी आता सखोल तपास सुरू आहे. तपास करणाऱ्या यंत्रणा या संपूर्ण कथित नेटवर्कच्या व्याप्तीचा तपास करत आहेत. तसेच त्यांच्याशी संबंधित इतर व्यक्ती किंवा संस्थांना ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत.