हिंदूंच्या सुरक्षेसाठी कॅनडा पोलिसांना हवाय ‘हप्ता’
कॅनडात हिंदूंवरील अन्याय कायम : ट्रुडो सरकारची हिंसक कारवायांकडे डोळेझाक
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडात आता पोलीसदेखील हिंदू समुदायावर दबाव टाकत असल्याचे दिसून येत आहे. कॅनडात हिंदू समुहांना सुरक्षा पुरविण्याच्या बदल्यात रकमेची मागणी केली जात आहे. यासंबंधी अधिकृतपणे काहीच बोलले गेले नाही, परंतु हिंदूंकडे सुरक्षेच्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडाचे संबंध तणावपूर्ण असून खलिस्तानी समर्थक कॅनडातील हिंदूंना धमकावत आहेत.
पील पोलिसांनी कथित स्वरुपात हिंदू समुदायाला सुरक्षा देण्यासाठी 70 हजार डॉलर्सची मागणी केली आहे. यामुळे तेथील हिंदू समुदाय नाराज आहे. कॅनडातील हिंदू संघटनांनी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सरकारवर अधिकारांचे उल्लंघन करण्याचा आरोप केला आहे. आम्ही कर भरणा करत आहोत, मग आमच्यासोबत हा भेदभाव का? पील पोलीस आमचे प्रश्न सोडविण्याऐवजी आमच्यावर दबाव टाकत असल्याचे कॅनडातील हिंदू संघटनांनी म्हटले आहे.
कॅनडाच्या सरकारवर खलिस्तानी समुहांकडून हिंदूंचे कार्यक्रम रद्द करविण्याचा दबाव असल्याने हे सर्व घडत आहे. ट्रुडो सरकार खलिस्तानी समूह आणि माजी सहकारी जगमीत सिंह यांचा वित्त विधेयकासाठी पाठिंबा मिळविण्यासाठी हिंसक कारवायांकडे दुर्लक्ष करत आहे. जगात पहिल्यांदाच स्थानिक पोलीस अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी पैशांची मागणी करत असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे.
अयोध्या मंदिरावर हल्ल्याची धमकी
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर रामजन्मभूमी परिसराची सुरक्षा व्यवस्था वाढवत हाय अलर्ट देण्यात आला आहे. पन्नूने 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी भीषण हल्ला केला जाणार असल्याची धमकी दिली होती.