कॅनडाचा आता अमित शहांवर आरोप
शीख फुटिरतावाद्यांना लक्ष्य करण्याचा आदेश दिल्याचा दावा, भारताकडून आरोपाची खिल्ली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कॅनडातील शीख फुटिरतावाद्यांना लक्ष्य करण्यात भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा हात आहे, असा नवा आरोप कॅनडाने केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कॅनडाने अमेरिकेला पुरविलेल्या गुप्त कागदपत्रांमध्ये अमित शहा यांचे नाव आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कॅनडाकडूनच ही माहिती पसरविण्यात आली असून भारताला लक्ष्य बनविण्याचा हा प्रयत्न असल्याचे तज्ञांचे मत आहे.
अमित शहा यांनी कॅनडातील शीख फुटिरतावादी नेत्यांना संपविण्याचा, घाबरविण्याचा आणि त्यांच्याविरोधात गुप्तचरांकडून माहिती संकलित करण्याचा आदेश दिला होता. कॅनडाचे विदेश व्यवहार मंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी या संबंधीची माहिती आपण अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राला दिल्याचे कॅनडा संसदेच्या सुरक्षा समितीसमोर मान्य केले होते, अशी माहिती प्रसिद्ध झाली आहे. या वृत्तपत्राच्या एका पत्रकाराने आपल्याला नाव विचारल्यानंतर आपण अमित शहा यांचे नाव यात आहे, असे स्पष्ट केले असे वक्तव्य त्यांनी संसदीय समितीसमोर केले, अशी माहिती उपलब्ध झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
स्पष्टता नाही
या प्रकरणात अमित शहा यांचा हात आहे, ही माहिती कॅनडाला कशी समजली, हे मात्र मॉरिसन यांनी त्यांच्या वक्तव्यात स्पष्ट केले नाही. एक वर्षापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनीही कॅनडाकडे यासंबंधी भक्कम आणि विश्वासार्ह पुरावे असल्याचा दावा केला होता. तथापि, काही दिवसांपूर्वीच त्यांनी असा कोणत्याही भक्कम पुरावा नसल्याचेही वक्तव्य केले होते. त्यामुळे कॅनडातील विद्यमान सरकार त्या देशातील निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी भारताला लक्ष्य बनवित आहे का, असा संशयही व्यक्त करण्यास जागा आहे.
भारताकडून सातत्याने इन्कार
कॅनडाच्या प्रत्येक आरोपाचा भारताकडून सातत्याने इन्कार करण्यात आला आहे. भारताने कॅनडाकडे त्याच्या आरोपांचा पुरावा मागितला असून अद्याप एकही पुरावा देण्यात आलेला नाही. विश्वासार्ह पुराव्याच्या अभावी भारत या प्रकरणात काहीही करु शकत नाही, असे कॅनडाला स्पष्टपणे कळविण्यात आले आहे.
उच्चायुक्तांचा आरोप
काही दिवसांपूर्वी कॅनडाने भारताच्या उच्चायुक्तांना कॅनडा सोडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार उच्चायुक्त भारतात परतले होते. मात्र, त्यांनी जस्टीन टूडो यांच्यावर भारताला राजकारणाचा बळी बनविल्याचा गंभीर आरोप केला होता. टूडो यांनी त्यांच्या राजकीय लाभासाठी भारताचे हित पणाला लावले आहे. त्यांचा कॅनडातील शीख फुटिरतावाद्यांशी नजीकचा संबंध असून ते शीख फुटिरतवाद्यांचे समर्थक आहेत, असा आरोपही त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेला आहे.