काणकोणात घराला आग; १२ लाखांचे नुकसान
काणकोण: तेंबेवाडा, काणकोण येथील लक्ष्मी कोमरपंत (७०) या महिलेच्या घराला २९ रोजी रात्री अकस्मात आग लागून संपूर्ण घर जळून गेले. सदर आगीत घरातील कपडे, भांडीकुंडी त्याचप्रमाणे मौल्यवान वस्तू जळून गेल्या आहेत. रात्री १०.३० च्या दरम्यान ही आग लागल्यानंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम केले असले, तरी त्यापूर्वीच घरातील सामान पूर्णपणे जळून गेले.
या आगीमुळे कोमरपंत सध्या बेघर बनल्या असून त्यांना जबरदस्त असा धक्का बसला आहे. या आगीत १२ लाख रु. पेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मात्र मिळू शकली नाही. तेंबेवाडा येथील कोमरपंत यांचे हे घर बरेच जुने होते आणि घराचे छप्पर जीर्ण अवस्थेत होते. मुलाचे बऱ्याच आधी निधन झालेले असल्यामुळे सून माहेरी गेली आहे, तर मुलीचा विवाह झालेला आहे. त्यामुळे सदर महिला त्या ठिकाणी एकटीच राहत आलेली आहे.
काणकोणच्या अग्निशामक दल स्थानकाचे चापोली येथे स्थलांतर करण्यात आलेले असून त्या ठिकाणी फोन कनेक्टिविटी व्यवस्थित मिळत नाही. त्यातच जिओ टॉवरचे काम चालू असल्यामुळे रेंज व्यवस्थित मिळत नाही, त्यामुळे रात्री १०.३० वा. प्रथम कॉल मिळाल्यानंतर लगेच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी धावून गेले व आग विझविण्याचे काम केले. त्यासाठी पाण्याचा एक बंब वापरण्यात आला व दुसरे वाहन लगेच पाठविण्यात आल्याची माहिती काणकोण अग्निशामक दलाचे प्रमुख धीरज देसाई यानी दिली.
आगीची माहिती मिळताच काणकोणच्या संयुक्त मामलेदार आर्या वेळीप आणि तलाठी राजेश वागोणकर, राजेंद्र वेळीप या मामलेदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. काणकोणचे पोलिस निरीक्षक तेहरान डिकॉस्ता यांनीही घटना स्थळी धाव घेऊन पाहणी केली. काणकोणच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीने तातडीची मदत म्हणून कोमरपंत यांना पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्याचप्रमाणे आगीत जळून गेलेल्या घरावर प्लास्टिक आवरण घालण्याची व्यवस्था केली.
मंत्री तवडकरांकडून पाहणी, घर बांधून देण्याचे आश्वासन
दरम्यान, या आगीची खबर मिळताच काणकोणचे आमदार तथा आदिवासी कल्याणमंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी पैंगीणचे जिल्हा पंचायत सदस्य अजय लोलयेकर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा नीतू देसाई आणि काणकोण भाजप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसहित तेंबेवाडा येथील कोमरपंत यांच्या जळालेल्या घराची पाहणी केली. या घराची सध्या झालेली अवस्था पाहता कोमरपंत यांना घर बांधून देतानाच सर्व प्रकारचे साहाय्य करण्याचे स्पष्ट आश्वासन तवडकर यांनी दिले. सध्या सदर महिला शेजारी असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे राहायला गेली आहे.
