मनपाकडून दुसऱ्या दिवशीही जाहिरात फलक हटाव मोहीम
प्रतिनिधी/ बेळगाव
काँग्रेस अधिवेशनानिमित्त शहरात लावण्यात आलेले जाहिरात फलक महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून गुरुवार दि. 26 रोजी पुन्हा काढण्यात आले. कॉलेज रोडवरील दुभाजकावर राजकीय नेत्यांच्या समर्थकांचे फलक काढून ते जप्त करण्यात आले. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेले बड्या नेत्यांचे फलक हटविण्यात आले नाहीत.
महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगावात 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने काँग्रेसकडून शताब्दी साजरी केली जात आहे. दोन दिवस गांधी भारतअंतर्गत अधिवेशन घेतले जाणार असल्याने शहरात सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वागत कमानी उभारण्यासह जाहिरात फलकही मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत.
बड्या नेत्यांच्या फ्लेक्ससह त्यांच्या समर्थकांकडून जागा मिळेल त्या ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगाव शहर अक्षरश: जाहिरात फलकांनी झाकोळले आहे. पण यासाठी महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घेण्यात आली नसल्याने बुधवारी काँग्रेस रोडवरील जाहिरात फलक हटविण्यात आले. त्यावेळी महापालिका कर्मचारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे फलक हटाव मोहीम थांबविली जाईल, अशी चर्चा होती. पण गुरुवारीदेखील कॉलेज रोडसह काही ठिकाणी महानगरपालिकेकडून जाहिरात फलक हटविण्यात आले.