दिव्यांग प्रमाणपत्रासाठी मंगळवारपासून शिबीर
प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांची माहिती : जिह्यात 2 हजार 462 मुलांना दिव्यांग प्रमाणपत्रांची गरज : तालुकानिहाय शिबीराचे आयोजन
कोल्हापूर प्रतिनिधी
जिह्यात 2 हजार 462 दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. पण या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राशिवाय दिव्यांग योजनांचा लाभ मिळू शकत नाही. या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र काढण्यासाठी 26 डिसेंबरपासून कोल्हापूरातील सीपीआर रूग्णालयामध्ये तालुकानिहाय शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरास दिव्यांग विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्यासाठी सर्व पंचायत समितींमधील गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळविले आहे. त्यामुळे या शिबीरास जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थी सहभागी कसे होतील ? यासाठी जिल्हा परिषदेच्या समावेशित शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक, विशेष शिक्षक, विषयतज्ञ व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केले आहे.
समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत वय वर्षे 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग मुलांचे सर्वेक्षण गटस्तरावर कार्यरत असणारे विशेष शिक्षक व विषय तज्ञांमार्फत केले जाते. सर्वेक्षण झाल्यानंतर आरपीडब्ल्यू अॅक्ट 2016 नुसार दिव्यांग मुलांच्या प्रवर्गानुसार वर्गीकरण केले जाते. समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विद्यार्थी शाळेत समायोजन होण्याच्या दृष्टिने विविध सेवा सुविधा शासनामार्फत पुरविल्या जातात. यामध्ये मदतनीस भत्ता, प्रवासभत्ता, वाचक भत्ता व मुलींना प्रोत्साहन भत्ता आदी सेवा पुरविण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे या सेवा सुविधा पुरविण्यास अडचणी निर्माण होतात. यासाठी शाळास्तरावर सर्वेक्षण झालेल्या दिव्यांग मुलांचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हास्तरावर तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील व प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या संकल्पनेतून दिव्यांग मुलांच्या प्रवर्गानुसार प्रमाणपत्र काढण्यासाठी मंगळवार (26 डिसेंबर) पासून सीपीआर रूग्णालय व कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयामध्ये तालुकानिहाय दिव्यांग मुलांचे प्रमाणपत्र काढण्याचे नियोजन केले आहे.
तालुका एकूण दिव्यांग विद्यार्थी प्रमाणपत्र नसलेले
आजरा 394 280
भुदरगड 489 302
चंदगड 282 137
गडहिंग्लज 494 152
हातकणंगले 1003 226
कागल 696 456
करवीर 585 206
पन्हाळा 545 213
राधानगरी 411 190
शाहूवाडी 351 150
शिरोळ 418 116
एकूण 5738 2462