कंबोडिया-थायलंडमध्ये शांतता करार पूर्णत्वास
डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी
वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी ‘आसियान’ शिखर परिषदेच्या निमित्ताने क्वालालंपूरमध्ये दाखल झाल्यानंतर थायलंड आणि कंबोडिया या देशांनी लष्करी संघर्ष संपवण्यासाठी शांतता करारावर स्वाक्षरी केली. या करारानंतर ट्रम्प यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. लोकांना अशक्य वाटणारी गोष्ट आपण शक्य करून दाखवल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. थायलंड आणि कंबोडियामध्ये मंदिराच्या वादावरून पाच दिवसांचे युद्ध झाले होते. या संघर्षात 48 लोकांचा मृत्यू झाला होता. हा संघर्ष संपवण्यात ट्रम्प यांनी मोठी भूमिका बजावली. क्वाललंपूरमध्ये आगमन झाल्यावर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी ट्रम्प यांचे रेड कार्पेटवर स्वागत केले. ते आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मलेशियात पोहोचले आहेत.