For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंबोडिया आणि थायलंड भिडतात मंदिरांसाठी

06:49 AM Jun 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
कंबोडिया आणि थायलंड भिडतात मंदिरांसाठी
Advertisement

कंबोडिया आणि थायलंड या आग्नेय आशियातील परस्पर शेजारी देशांच्या अर्थव्यवस्था प्रगतीशील अर्थव्यवस्था मानल्या जातात. गेल्या 28 मे रोजी या दोन शेजारी देशातील वादग्रस्त सीमेवर लष्कर परस्परास भिडले आणि गोळीबार झाला. त्यात एक कंबोडियन सैनिक मारला गेला. सीमेवर असलेले ‘प्रसात ता मोआन थॉम’ हे प्राचीन हिंदू शिव मंदिर या झटापटीस कारणीभूत ठरले. मंदिरांसाठी झगडणाऱ्या या दोन देशांमधील घडत असलेल्या घडामोडींचा घेतलेला आढावा...

Advertisement

कंबोडिया आणि थायलंड हे आग्नेय आशियातील परस्पर शेजारी देश आहेत. सुमारे पावणे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या कंबोडियात बहुपक्षीय लोकशाहीस मान्यता असली तरी दीर्घकाळ देशावर कंबोडियन पीपल्स पार्टीची एकपक्षीय सत्ता आहे. विशेषत: पंतप्रधानपदावर घराणेशाहीचा प्रभाव आहे. दुसरीकडे सात कोटी लोकसंख्या असलेल्या थायलंडमधील लोकशाही बऱ्याच प्रमाणात हुकुमशाहीकडे झुकणारी आहे. या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था आशियातील प्रगतीशील अर्थव्यवस्था मानल्या जातात. गेल्या 28 मे रोजी या दोन शेजारी देशातील वादग्रस्त सीमेवर लष्कर परस्परास भिडले आणि गोळीबार झाला. त्यात एक कंबोडियन सैनिक मारला गेला. सीमेवर असलेले ‘प्रसात ता मोआन थॉम’ हे प्राचीन हिंदू शिव मंदिर या झटापटीस कारणीभूत ठरले. फेब्रुवारी महिन्यात सैन्याने संरक्षण दिलेल्या कंबोडियन राष्ट्रवादींच्या एका गटाने, दोन्ही देश ज्यावर दावा करतात त्या ता मोआन थॉम मंदिरात राष्ट्रगीत गायले. थाई सैनिकांनी या कृतीस विरोध केला. त्यातून दोन्ही बाजूंच्या सैनिकांत वाद झाला. एका थाई नागरिकाने या घटनेची चित्रफित बनवून ती समाज माध्यमांवर पाठवली. ती सर्वत्र पसरुन वातावरण तापले. ज्याची परिणती गोळीबारात झाली. कालांतराने दोन्ही देशांच्या सैन्याने तणाव कमी करण्यास सहमती दर्शवली. मात्र, लागलीच ‘थायलंडने मंदिर प्रदेशातून निघून जाण्याचा आग्रह धरला तरीही आपले सैन्य या भागात असेल’, असे मत कंबोडियाने व्यक्त केले. दुसऱ्या बाजूने थायलंडच्या सैन्याने कंबोडियास लागून असलेले सीमाप्रवेश मार्ग आपल्या बाजूने नियंत्रित केले. त्यासाठी देशाच्या सार्वभौमत्वाला व सुरक्षेला धोका असल्याचे कारण देण्यात आले.

थायलंडने सीमा प्रवेश नियंत्रित केल्यानंतर कंबोडियाचे माजी पंतप्रधान व विद्यमान पंतप्रधानांचे वडील हुन सेन यांनी थायलंडला त्याच्या निर्यातीवर होणाऱ्या परिणामांबाबत इशारा दिला. त्यातून थायलंडची निर्यात प्रधान अर्थव्यवस्था कशी धोक्यात येईल हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. काही कंबोडियन व्यापाऱ्यांनी थाई उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. परंतु सरकारने अशा अती उत्साहास आवर घालण्याची समज संबंधितास दिली. एकंदरीत सीमेवर झालेल्या चकमकीमुळे थायलंड-कंबोडिया दरम्यान व्यापर, वाहतूक आणि पर्यटनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तणाव पूर्णत: निवळल्याशिवाय परिस्थिती सुधारणे कठीण आहे. तसे पाहता, इतर कोणत्याही आग्नेय आशियाई देशांपेक्षा कंबोडिया आणि थायलंड दरम्यान उल्लेखनिय सांस्कृतिक समानता आहे. 95 टक्के कंबोडियन तर 93 टक्के थाई लोक बौद्ध धर्मिय आहेत. दोन्ही देशात अप्सरा नृत्य व किक बॉक्सिंग यासारख्या सांस्कृतिक बाबी प्रचंड लोकप्रिय आहेत. राष्ट्र-धर्म-राजा हा राष्ट्रीय मंत्र दोन्ही देशात सारखाच जपला जातो. वांशिक-सामाजिक वैशिष्ट्यो, पाककृती, लिपी लेखनही एकसमान आहे. अशा प्रकारचे अद्वितीय साम्य असणाऱ्या दोन देशात खरेतर सख्य, सौहार्द आणि बंधुत्व असावयास हवे. मात्र दुर्दैवाने तसे घडलेले नाही. याउलट सांस्कृतिक समानताच ऐतिहासिक दृष्ट्या दोन्ही देशातील संघर्षाचे मूळ कारण बनली आहे. सांस्कृतिक वारशाचे मूळ मालक आपणच असल्याचा दावा दोन्ही देशांचे नागरिक, प्रशासन आणि सरकारे सातत्याने करीत असतात. परिणामी, एकाच सांस्कृतिक वारशावर हक्क सांगणारे परस्पर विरोधी राष्ट्रवाद दोन्ही देशात प्रचलीत झाले आहेत. या अजब राष्ट्रवादास सीमावाद, अर्थवाद, वारसा हक्कवाद अशा तऱ्हेचे विविध आयाम काळाच्या ओघात लाभले आहेत. त्यातून सातत्याने उभयपक्षी संघर्षही झडत राहिला आहे.

Advertisement

कंबोडियास 1953 साली फ्रेंच वसाहतवाद्यांपासून स्वातंत्र्य मिळाले. थायलंड आणि कंबोडिया देशांच्या भू-सीमेचे आरेखन व नकाशे 1907 साली फ्रेंचानी केले होते. थायलंडला सुरुवातीपासूनच 817 कि.मी.ची ही सीमारेषा अमान्य आहे. 2000 साली दोन्ही देशांनी परस्पर संवादातून सीमाप्रश्नाचे निराकरण करण्यासाठी संयुक्त सीमा आयोग स्थापन करण्याचे मान्य केले. तरीही सीमावाद मिटवण्याच्या दिशेने फारशी प्रगती झाली नाही. यानंतर दोन्ही देशात ऐतिहासिक हिंदू मंदिरांच्या वारसा हक्कावरुन वादास तोंड फुटले. मूलत: हिंदू देवतांची हि मंदिरे आग्नेय आशियात बौद्ध धर्माचा प्रभाव वाढल्यानंतर त्या राजवटींच्या अखत्यारीत गेली होती. 1150 मध्ये ख्मेर राजा सूर्यवर्मन दुसरा याच्या आदेशाने आंगकोर येथे विष्णू देवाला समर्पित हिंदू मंदिर संकूल बांधण्यात आले होते. काही संशोधकांच्या मते जगातील सर्वात मोठे धार्मिक बांधकाम असलेल्या आंगकोर मंदिरास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. सध्या कंबोडियाच्या हद्दीत असलेल्या या मंदिराच्या अधिकार क्षेत्रावर, 2003 मध्ये थायलंडच्या एका वलयांकित व्यक्तीने हक्क सांगितला. त्यावरुन तणाव निर्माण होऊन कंबोडियातील थाई दुतावास आणि व्यावसायिक आस्थापनांना आगी लावण्यात आल्या. वादाच्या केंद्रस्थानी असलेले आणखी एक मंदिर म्हणजे, कंबोडियन हद्दीतील ‘प्रेह विहार मंदिर’. हे मंदिर संकुल भगवान शंकराला समर्पित आहे. हिंदू राजे सूर्यवर्मन पहिला आणि सूर्यवर्मन दुसरा यांच्या कारकिर्दीत 850 वर्षांपूर्वी या मंदिराची उभारणी झाली. कंबोडियाच्या स्वातंत्र्यानंतर दोन्ही देश या मंदिर परिसरावर हक्क सांगू लागले. परिणामी, ऐतिहासिक मालकीचा दावा आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला. 1962 साली न्यायालयाने कंबोडियाच्या बाजूने निकाल दिला. परंतु थायलंडने आपला हेका कायम ठेवला. 2008 मध्ये कंबोडियाच्या मागणीवरुन युनेस्कोने प्रेह विहार मंदिर संकुलास जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. यावरुन थायलंडमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला. नंतरच्या काळात या मंदिरावरील वादावरुन संघर्ष होत राहिला. आतापर्यंत अशा संघर्षात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारोजण या प्रदेशातून विस्थापित झाले आहेत. सध्याचा जो वाद उफाळला आहे ते ‘प्रसात ता मोएन थॉम’ शिव मंदिर राजा जयवर्मन सहावा या ख्मेर सम्राटाने 13 व्या शतकात बांधले होते. या मंदिराचा वाद तेथून पूर्वेस सुमारे 140 कि.मी. अंतरावर असलेल्या प्रेह विहारवरील वादाशी मिळताजुळता आहे. एकंदरीत मूळ हिंदू मंदिरे, ख्रिस्त धर्मीय फ्रेंचानी आखलेली सीमा व केलेले विभाजन आणि त्यावरुन उद्भवणारे दोन बौद्ध धर्मीय देशातील वाद असे विलक्षण चित्र कंबोडिया-थायलंड संघर्षात गेली कित्येक वर्षे दिसून येत आहे. 13 व्या शतकानंतर जरी या प्रदेशात बौद्ध धर्म प्रसारीत झाला तरी तेथील बौद्ध व हिंदू समाजाचे संबंध सलोख्याचे राहिले. नंतरच्या कोणत्याही बौद्ध राजाने मूळ हिंदू मंदिरांचा विध्वंस, मूर्तीभंजन करण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. याऊलट या दोन्ही धर्म संस्कृतींची सरमिसळ या प्रदेशात पहावयास मिळते. असे असताना, हा सहअस्तित्वाचा वारसा सोडून मंदिर वारशासाठी दोन्ही बौद्ध देश वाद घालताहेत हा प्रकार खेदजनकच म्हणावा लागेल.

मंदिरांशिवाय दोन्ही देशात तणाव वाढवणारे इतरही मुद्दे आहेत. कंबोडिया-थायलंड सीमावर्ती प्रदेश तस्करी, बेकायदा वृक्षतोड अशा कारवायांनी ग्रस्त आहे. या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी थायलंडने वाढवलेले लष्कर कंबोडियास आक्रमक स्वरुपाचे वाटते. याऊलट थायलंडचे अधिकारी कंबोडियन सीमा सुरक्षा दलावर ते अवैध व्यापारास अनुकूल असल्याचा आरोप करतात. थायलंडची राजकिय अस्थिरता, प्रशासनावर लष्कराचा प्रभाव, सत्ता बळकट करण्याचा कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांचे प्रयत्न यामुळे दोन्ही शेजारी देश राष्ट्रवादी व सुरक्षा केंद्रीत धोरणांकडे ढकलले गेले आहेत. या गतिशीलतेमुळे द्विपक्षीय राजनैतिक प्रक्रिया कमालीची संवेदनशील व प्रतिक्रियात्मक बनली आहे. थायलंडमधील स्थलांतरीत कंबोडियन कामगारांवरील अन्याय व सीमावर्ती भागातील वाढत्या द्वेषभावनांमुळे संबंध अधिक तणावपूर्ण बनले आहेत.

वास्तविक 10 आग्नेय आशियायी राष्ट्रांची संघटना ‘आसियान’चे मुख्यालय कंबोडियाची राजधानी जकार्ता येथे आहे. आग्नेय क्षेत्रातील आर्थिक, सामाजिक व सीमाविषयक समस्या सोडवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी संघटनेची स्थापना झाली आहे. दोन्ही संघर्षरत देश तिचे सदस्य आहेत. अशा स्थितीत कंबोडिया-थायलंड दरम्यानच्या दीर्घकालीन समस्येवर कायमस्वरुपी तोडगा न निघणे हे एक प्रकारे आसियानच्या अलिकडील निष्क्रियतेचे द्योतक ठरते.

-अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :

.