बीएसएनएलचे आता विना सिमकार्ड, नेटवर्कशिवाय कॉलिंग
ग्राहकांसाठी लवकरच नवी सुविधा : कंपनीची लोकप्रियता वाढतेय
नवी दिल्ली :
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) हळूहळू भारतातील लोकप्रिय सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बनण्याची तयारी करत आहे. सर्व खासगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर अनेक लाख वापरकर्तें बीएसएनएलशी जोडले गेले आहेत. अशा प्रकारे बीएसएनएल देखील लोकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी नवीन करत आहे.
सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएलने अलीकडेच इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये आपला नवीन लोगो आणि स्लोगन लाँच केले. तसेच आपल्या 7 नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या 7 सेवांपैकी एक बीएसएनएलची डी2 डी म्हणजेच डायरेक्ट टू डिव्हाईस सेवा आहे. बीएसएनएलच्या डी2 डी सेवेसह, लोक सिम कार्ड आणि मोबाईल नेटवर्कशिवाय कॉल करू शकतात.
बीएसएनएलची डी2 डी सेवा
बीएसएनएलच्या डी2डी सेवेसह, लोकांना सॅटेलाइटद्वारे कॉल करण्याची सुविधा मिळू शकते. यामध्ये लोक कोणत्याही सिमकार्ड आणि मोबाईल नेटवर्कशिवाय कॉल करू शकतात. मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागात ही सेवा अतिशय फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तीच्या काळातही ही सेवा अत्यंत उपयुक्त आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नेटवर्क अनेकदा कमकुवत होते. त्यामुळे अशावेळी बीएसएनएलची सेवा खूप उपयुक्त ठरणार आहे.
डी2डी सेवा कशी काम करते?
डी2डी सेवा उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे काम करते. उपग्रह आकाशातील मोठ्या टॉवर्सप्रमाणे काम करतात. कॉलिंगला सपोर्ट करण्यासाठी ते एका मोबाईलला दुसऱ्या मोबाइलला जोडते, ज्यामुळे कॉलिंग शक्य होते. सध्या बीएसएनएल आपल्या सेवेची चाचणी घेत आहे. बीएसएनएलने यासाठी वायसॅट नावाच्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे.