आवश्यकता भासली तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावेन!
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर‘
अधिकर वाटपाबाबत चर्चेची आवश्यकता भासली तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिल्लीला बोलावून घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहे.
सोमवारी बेंगळुरातील निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात नेतृत्त्व बदलाचा मुद्दा उपस्थित झालेला नाही. जर तशी वेळ आली तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिल्लीला बोलावण्यात येईल. त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे स्पष्टीकरण त्यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना दिले.
राज्यात मुख्यमंत्री बदलाचा गोंधळ हायकमांडने निर्माण केलेला नाही, राज्य नेत्यांनीच केला आहे. त्यामुळे हा गोंधळ त्यांनीच दूर करावा, असे वक्तव्य यापूर्वी खर्गे यांनी केले होते. आता त्यांनी नेतृत्व बदलाबाबत आवश्यकता भासली तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावून घेतले जाईल असे वक्तव्य करून कुतूहलात भर टाकली आहे.
तत्पूर्वी डी. के. शिवकुमार यांनी खर्गे यांची भेट घेऊन सुमारे 45 मिनिटे चर्चा केली. यावेळी दिल्लीत मुख्यमंत्रिपद वाटाघाटीबाबत झालेल्या करारानुसार आपल्याला मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी विनंती शिवकुमारांनी केल्याचे समजते. याचप्रसंगी खर्गे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीत मी राहुल गांधींच्या निर्णयाविरुद्ध जाऊ शकत नाही, असे शिवकुमार यांना सांगितल्याचे समजते.
शिवकुमारांनी घेतली खर्गेंची भेट
राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या अधिकार हस्तांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सोमवारी बेंगळुरात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यामुळे काँग्रेस गोटात तर्कवितर्क व्यक्त होत आहे.
राज्यात मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळ पुनर्रचनेची मागणी होत असतानाच शिवकुमारांनी खर्गेंची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय काँग्रेसचे मुख्य सचिव व राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला हे राज्य दौऱ्यावर येत असल्याने देखील ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
अत्यंत मेहनतीने या पदापर्यंत येऊन पोहोचलो आहे. आगामी काळात पक्षाकडून आपल्याला योग्य संधी मिळेल, अशी अपेक्षा शिवकुमार यांनी खर्गेंकडे व्यक्त केल्याचे समजते. शिवकुमारांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे सूत्रांकडून समजते.
प्रदेशाध्यक्ष असल्याने शिस्तीचे उल्लंघन होऊ नये यासाठी डी. के. शिवकुमार यांनी पक्षातील आपल्या समर्थकांना उघडपणे वक्तव्य करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न चालविला आहे. सध्या त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रिपद हस्तांतराबाबत येत्या काळात हायकमांड कोणती भूमिका घेते, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
शिवकुमार घेणार सोनिया गांधी, राहुल यांची भेट?
आसाम विधानसभा निवडणुकीची जबाबदारी काँग्रेस पक्षाने मुख्य सचिव प्रियांका गांधी यांच्यावर सोपविली आहे. तर डी. के. शिवकुमार व इतर नेत्यांना निरीक्षक म्हणून नेमले आहे. निवडणुकीसंबंधी 16 व 22 जानेवारी रोजी दिल्लीत महत्त्वाच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात डी. के. शिवकुमार हे देखील सहभागी होतील. याप्रसंगी वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन मल्लिकार्जुन खर्गे यांनी शिवकुमार यांना दिल्याचे समजते.