अमली पदार्थविरोधात शनिवारी पलूस बंदची हाक
पलूस :
अमली पदार्थाचे सेवन व नशेचे इंजेक्शनच्या विळख्यात तरूणांनी बळी पडू नये, यासाठी पलूस शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी विधायक पाऊल उचलले आहे. अमली पदार्थ, नशेचे इंजेक्शनया विरोधात जनजागृतीसाठी शनिवारी २२ रोजी संपूर्ण पलूस शहर कडकडीत बंद ठेवून शहरातून जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील लोकप्रतिनिधी, नागरीक, व्यापारी, विद्यार्थी, डॉक्टर्स, शिक्षक, विविध संस्थाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती पत्रकार बैठकीत देण्यात आली.
येथील सिध्देश्वर मंदिरामध्ये सर्वपक्षीय नेते व डॉक्टर्स, व्यापारी यांनी पत्रकार परिषद घेवून प्रबोधन रॅलीविषयी माहिती दिली. शनिवारी सकाळी आठ वाजता कुंडलवेस येथून रॅलीस प्रारंभ होणार आहे. ही रॅली गावातील प्रमुख मार्गावरून शिवतीर्थपर्यंत पोहचेल. त्यानंतर उपस्थिाना अमली पदार्थ व त्यापासून होणारे दुष्परिणाम या विषयी तज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले, स्वाभिमानी विकास आघाडीचे निलेश येसुगडे, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिगंबर पाटील, रावसाहेब गोंदील, विष्णू सिसाळ, पी. एस. माळी, भरतसिंह इनामदार, शहर भाजपा अध्यक्ष रामानंद पाटील, नितीन खारकांडे, कपिल गायकवाड, प्रशांत लेंगरे, डॉ. आशुतोष पाटील, डॉ मिलिंद जोशी, स्वप्नील पाटील, हणमंत मोहिते, उमेश पाटील, सुभाष थडस, नितीन डाके, सर्व शाळांचे शिक्षक, व्यापारी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आपल्या देशाचे भवितव्य म्हणून ज्या युवा पिढीकडे पाहिले जाते ती युवा पिढी व्यसनाच्या आहारी भरटकत चालली आहे, पलूस शहरातील अनेक तरुण-तरुणी चुकीच्या मार्गावर जात व्यसनाधीत बनत आहे. अंमली पदार्थांचे सेवन व नशेचे इंजेक्शन घेत आहेत असे निदर्शनास येत आहे. राजरोसपणे अंमली पदार्थाची विक्री करीत आहेत. पलूस शहरातील अमली पदार्थावर निर्बंध व विक्रेत्यावर कठोर कारवाई करणेबाबत जनजागृती म्हणून शनिवारी २२ रोजी पलूस शहर बंद ठेवण्यात येणार आहे .