सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक बोलवा
युवा समितीची महाराष्ट्र उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी : मराठी भाषिकांविरोधात भूमिका घेणाऱ्यांना निलंबित करा
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र, कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकार 2004 साली सर्वोच्च न्यायालयात गेले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या खटल्याची सुनावणी 21 जानेवारी रोजी होणार आहे. या सुनावणीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलवावी अशी मागणी मध्यवर्ती म. ए. समितीने महाराष्ट्र सरकारकडे केली होती. परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनीही महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवले असून, याची दखल घेऊन उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलवावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागातर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर विमानतळावर त्यांची भेट घेऊन चर्चा केली. संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सीमा भागातील सद्यस्थितीची माहिती त्यांना दिली.
सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र शासनाची ठोस भूमिका नाहीच
कर्नाटक सरकारने या अगोदरही व आताही यासंदर्भात आक्रमकपणे भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. पण गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र शासनाने सीमा प्रश्नासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. बेळगावसह सीमाभागात होत असलेले भाषिक अत्याचार सहन करत सीमावासीय त्याला तोंड देत आहेत. तरी उच्चाधिकार समितीची बैठक बोलावून यामध्ये विषयावर चर्चा होऊन सीमावासियांना लवकरात लवकर न्याय मिळेल, या अनुषंगाने यामध्ये जातीने लक्ष घालून लवकरात लवकर ही बैठक बोलवावी अशी मागणी करण्यात आली.
शुक्रवारी बेळगावात शिवसेना शिंदे गटाच्या तथाकथित कर्नाटकी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सीमाप्रश्नी व मराठी भाषिकांच्या विरोधी भूमिका घेतली. या संदर्भातही एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन युवा सीमाभागाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून त्यांना पदावरून तात्काळ निलंबित करा, अशी जोरदार मागणी केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके महाराष्ट्र शासनाचीयांनाही या संदर्भात माहिती देण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर, लक्ष्मीकांत पाटील, अशोक घगवे आदी उपस्थित होते.