कॅलिफोर्नियातील वणव्याचे संकट तीव्र
40 हजार एकरमध्ये फैलावली आग : 10 हजार इमारती भस्मसात : 30 हजार घरांचे नुकसान, 10 जणांचा बळी
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
अमेरिकेतील प्रांत कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिसमध्ये चहुबाजूला लागलेल्या आगीमुळे पडलेल्या बळींचा आकडा वाढून शुक्रवारी 10 वर पोहोचला आहे. कैलिफोर्नियात भडकलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा वणवा आहे. मागील 4 दिवसांपासून लागलेली आग आता जवळपास 40 हजार एकरमध्ये फैलावली आहे. 29 हजार एकरचा भूभाग पूर्णपणे जळून गेला आहे. आगीमुळे सुमारे 10 हजार इमारती भस्मसात झाल्या असून 30 हजार घरांचे नुकसान झाले आहे.
सुमारे 50 हजार लोकांना त्वरित घर खाली करण्यास सांगण्यात आले आहे. तर 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने शनिवारपर्यंत आग आणखी फैलावण्याचा इशारा दिला आहे. आगीची तीव्रता पाहून या भागांमध्ये अणुबॉम्ब पाडविण्यात आल्यासारखे वाटत असल्याचे लॉस एंजिलिस काउंटीचे शेरिफ (जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासमान) रॉबर्ट लूना यांनी म्हटले आहे.
कमला हॅरिस यांनाही फटका
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे लॉस एंजिलिसच्या ब्रेटनवुड येथील निवासस्थान रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लॉस एंजिलिस अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेली काउंटी असून तेथे 1 कोटीपेक्षा अधिक लोक राहतात. कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर्स आणि विमानांद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु वाहणारे जोरदार वारे आणि त्यांची दिशा बदलल्याने आग अनेक ठिकाणी फैलावत आहे. सुमारे 7500 अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याच्या कामात सामील आहेत. बचाव पथक हजारो लोकांना सुरक्षितस्थळी नेत आहे. शाळा, सामुदायिक केंद्रं आणि अन्य सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी फायर हायड्रेंट्स म्हणजेच आग विझविणारी यंत्रं कोरडी पडली असून त्यांच्या आतील पाणी संपले आहे.
हॉलिवूड हिल्सवर लागली आग
कॅलिफोर्नियात आग ज्याप्रकारे आग फैलावत आहे, ते पाहता हॉलिवूड हिल्सवरील अमेरिकन चित्रपटसृष्टीची ओळख ठरलेला ‘हॉलिवूड बोर्ड’ जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. लॉस एंजिलिसमध्ये हॉलिवूड नावाचे एक ठिकाण असून त्यावरूनच अमेरिकन चित्रपटसृष्टीला हॉलिवूड हे नाव मिळाले आहे. आगीमुळे या शहराच्या पॅलिसेड्स येथील अनेक हॉलिवूड कलाकारांचे बंगले भस्मसात झाले आहेत. पॅरिस हिल्टन, स्टीवन स्पीलबर्ग, मँडी मूर, एश्टन कूचर समवेत अनेक हॉलिवूड कलाकारांची निवासस्थानी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. पॅरिस हिल्टनने 72 कोटी रुपये खर्चुन स्वत:चे घर निर्माण केले होते. तर अनेक अन्य कलाकारांही स्वत:चे घर सोडावे लागले आहे.
डोनाल्ड ट्रम्प अन् बिडेन यांची परस्परांवर टीका
कॅलिफोर्नियातील संकटामुळे अध्यक्ष जो बिडेन यांनी स्वत:चा इटलीचा दौरा रद्द केला आहे. कॅलिफोर्नियात लागलेली आग रोखणे आणि पुनउ&भारणीत मदत करण्यासाठी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत. याकरता कितीही वेळा लागला तरीही चालेल. संघीय सरकार जोपर्यंत कॅलिफोर्नियाला गरज आहे तोपर्यंत मदत करत राहणार, असे उद्गार बिडेन यांनी काढले आहेत. तर ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियातील संकटासाठी बिडेन यांना जबाबदार ठरविले आहे. फायर हायड्रेंटमध्ये पाणी नाही, फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंटकडे निधी नाही, बिडेन अशाप्रकारची परिस्थिती माझ्यासाठी ठेवून जात आहेत, अशी उपरोधिक टिप्पणी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. कॅलिफोर्नियातील डेमोक्रेटिक गव्हर्नर गॅविन न्यूजकम आणि त्यांच्या लॉस एंजिलिस टीमने आगीवर शून्य नियंत्रण मिळविले आहे. ही आग अधिकच भडकत चालली असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.