Konkan News : तवसाळ-जयगड समुद्री अंतर होणार कमी, जयगड खाडीवर उभारणार 'केबलस्टेड' पूल
जयगड खाडीवर 715 कोटींचा ‘केबलस्टेड’ पूल उभारण्यात येणार आहे
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समुद्री महामार्गादरम्यान 715 कोटींचा भव्य ‘केबलस्टेड’ पूल उभारण्यात येणार आहे. गुहागर तालुक्यातील तवसाळ ते रत्नागिरी तालुक्यातील जयगड हे समुद्री अंतर पार करणे, या पुलामुळे सहजशक्य होणार आहे.
तसेच मुंबईतील वरळी सिलींकप्रमाणे या जयगड खाडीवरील केबलस्टेड पुलामुळे येथील समुद्री महामार्गाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रेवस ते रेड्डी असा 498 किलोमीटर लांबीचा समुद्री महामार्गाचा प्रकल्प हाती घेतला आहे.
या समुद्री महामार्गामुळे रायगडच्या किनारपट्टीचा भाग तसेच पुढे रत्नागिरी तालुक्यातील काही महत्वाच्या खाड्या आणि पुढे सिंधुदुर्ग जिह्यातील रेड्डी गाव अशा हा सागरी महामार्गासाठी 7 हजार 851 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या सागरी महामार्गावर रेवस, धरमतर, कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड, आणि कुणकेश्वर असे 7 पूल उभारण्यात येणार आहेत.
जयगड खाडीचे मनोहारी दृष्य न्याहाळता येणार
यापैकी रत्नागिरी तालुक्यातील जयगड खाडीवर 715 कोटींचा ‘केबलस्टेड’ पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाची लांबी 2.09 किलोमीटर इतकी असून ऊंदी 18 मीटर असणार आहे. दोनपदरी वाहतूक असणाऱ्या या पुलावर पर्यटकांसाठी दोन्ही बाजूला पादचारी रस्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या पादचारी रस्त्यावरून पर्यटकांना जयगड खाडीचे मनोहारी दृष्य न्याहाळता येणार आहे.
पर्यटनात भर पडणार
या पुलाची उंची भरती रेषेच्या वरती 40 मीटर असणार आहे. तर या पुलासाठी उभारण्यात येणाऱ्या दोन पिलरमधील अंतर 100 मीटर इतके असणार आहे. यामुळे मोठी जहाज तसेच प्रवासी जहाजांना ये-जा करणे सहजशक्य होणार आहे. या पुलावर करण्यात येणारी विद्युत रोषणाई तसेच पर्यटकांसाठी, प्रवाशांसाठी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पादचारी रस्त्यामुळे येथील पर्यटनात भर पडणार असल्याचे महाराष्ट राज्य रस्ते विकास महांमंडळाकडून सांगण्यात आले.