कडोली भागात 15 पंपसेटच्या केबलची चोरी
शेतकऱ्यांना सुमारे अडीच लाखांचे नुकसान, पोलिसांचे साफ दुर्लक्ष, सहा महिन्यातील तिसरी घटना
वार्ताहर/कडोली
कडोली नदीकाठाकडील शिवारात तब्बल 15 शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपसेट मोटारीच्या केबल चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून अशा घटना परिसरात वारंवार घडत आहेत. मात्र या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याकडे पोलिसांना अपयश आले असून तातडीने त्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे. कडोली परिसरातील गेल्या सहा महिन्यांतील पंपसेट चोरीची ही तिसरी घटना आहे. शिवूळतठ, नदीकाठ परिसरातील शिवारात तब्बल 15 शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपसेट मोटारींच्या केबल रात्री चोरट्यांनी चोरी करून संपूर्ण शिवारभर हाहाकार माजविला आहे.
त्यामुळे या चोरट्यांचा धुमाकूळ वाढत असून कडोली पंचक्रोषीतील अनेक गावातील केबल चोरल्या गेल्या आहेत. परिणामी वारंवार याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र याकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. चोरटट्यांना कशाचीच भीती राहिली नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरीवर्गातून भीतीचे वातावरण पसरले असून, शिवारातील विद्युत मोटारींसह शेती उपयोगी अवजारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. चोरी झालेल्या मोटार पंपसेटच्या केबलची किंमत सुमारे अडीच लाखांच्या जवळपास आहे. परिणामी ही नुकसानभरपाई कोण देणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चोरट्यांचा दररोजचा प्रकार
कडोलीसह गौंडवाड, कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्दसह इतर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ माजविला आहे. काही दिवस गेले की, वेगवेगळ्या गावांवर पाळत ठेवून चोरी करण्यात चोरटे तरबेज झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी गेंडवाड येथेही चोरट्यांनी पंपसेटच्या विद्युत केबल लांबविल्याचे उघडकीस आले होते. कडोली येथे चार ते पाच महिन्यांपूर्वीदेखील चोरट्यांनी असा धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा कडोली येथे चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
20 हून अधिक पंपसेटच्या केबल चोरी
कडोली नदीकाठ परिसरात सुमारे 20 हून अधिक पंपसेटच्या केबल चोरी केल्याच्या घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. या घटना वारंवार घडत आहेत. चोरट्यांनी घातलेल्या धुमाकुळामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशा घटना वारंवार घडत असून याला आळा कोण घालणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तालुकाभर केबल चोरीच्या घटना
चोरटे ऐवढे शिरजोर झाले आहेत की, संपूर्ण तालुकाभर केबल चोरीच्या घटना घडतच आहेत. यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस खात्याने रात्रीच्यावेळी शिवारात पोलीस गस्त ठेवणे गरजेचे बनले आहे. शिवारातील मोटारींच्या विद्युत केबलही आता सुरक्षित नाहीत. वारंवार होणाऱ्या या घटनांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.