साने गुरुजी वसाहत भाजी मार्केटमधील केबिन्स ‘धूळखात’
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
साने गुरुजी वसाहत प्रभागात 77 लाख रूपये खर्चून बांधलेल्या भाजी मार्केटमध्ये दिव्यांगांसाठी विशेषत: उभा केलेल्या केबिन्स प्रचंड दुरवस्था झाली आहे. गेल्या 6 वर्षापासून तब्बल 12 केबिन्स वापराविना पडून आहेत. यामुळे महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. लाखो रुपये खर्चूनही भाजी मंडईच सुरू झाली नसल्याने केबिनधारकांनी याकडे पाठ फिरवली आहे. याकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असुन केबिन्सची अवस्था असुन अडचण नसुन खोळंबा अशी झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून 5 टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च केला जातो. याअंतर्गत या केबिन्स उभा केल्या आहेत. यासाठी खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. महानगरपालिकेने दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने लाखो रुपये खर्चून सहा वर्षापूर्वी सदर केबिन्स उभे केले. मात्र, सदर केबिन्स वापरात नसल्याने पावसाच्या माऱ्यामुळे याचा पत्रा सडला आहे. गाळ्यांच्या देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
साने गुरुजी वसाहत परिसरातील भाजी मार्केट हे स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र ते सुरूच नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी भाजी मंडई सुरू झाल्यानंतर केबिन्समध्ये व्यवसाय सुरू करून दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र केबिन्स बांधण्यात आले, ज्यामुळे त्यांना छोटे व्यवसाय करून स्वावलंबनासाठी मदत होईल असा उद्देश होता.
- केबिन्स लागल्या सडू
केबिन्सची रचना आधुनिक पद्धतीने करण्यात आली होती, ज्यामध्ये दिव्यांगांसाठी सोयी-सुविधांचा समावेश होता. मात्र, प्रत्यक्षात हे केबिन्स वितरित करण्यात आल्या असले तरी त्यांचा वापरच झाला नाही. परिणामी, केबिन्सचा पत्रा जीर्ण होत चालला आहे. केबिन्समध्ये धूळ व कचरा भरला आहे. केबिन्सच्या भोवती प्रचंड प्रमाणात गवत वाढले आहे.
- नागरिकांतून तीव्र नाराजी
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतका खर्च करूनही या गाळ्यांचा उपयोग का होत नाही? दिव्यांगांसाठीच्या योजना केवळ कागदावरच राहतात का? असे अनेक प्रश्न नागरिकांतून व्यक्त केले जात आहेत. केबिन्स पडून असल्याने परिसरात कचरा आणि घाणीचे साम्राज्य वाढले आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
- दिव्यांगांचे स्वप्न धुळीला
दिव्यांगांसाठीच्या या योजनेचा उद्देश प्रंशसनीय असला, तरी त्याची अंमलबजावणी न झाल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत तातडीने पावले उचलून गाळे वितरित करणे आणि त्यांचा योग्य वापर होईल याची खात्री करणे गरजेचे आहे. अन्यथा, लाखो रुपयांचा खर्च आणि दिव्यांगांचे स्वप्न धुळीला मिळण्याची शक्यता आहे.
- भाजी विक्रेत्यांना शिस्त लावण्याची गरज
तब्बल 77 लाख रूपये खर्चून अद्ययावत तयार केलेली सानेगुरूजी वसाहत येथील भाजी मार्केट पडून आहे. ज्या उद्देशाने भाजी मार्केट उभे केले त्या उद्देशाला भाजी विक्रेत्यांनीच हरताळ फासली आहे. किरकोळ कामाचे कारण पुढे करत सानेगुरूजी वसाहत येथील मुख्य मार्गाच्या दुतर्फा अवैधरित्या ठाण मांडले आहे. यांना शिस्त लावण्याची गरज आहे.
- कारवाईचा बडगा उगारावा
भाजी मंडई असतानाही बहुतांश भाजी विक्रेते सानेगुरूजी वसाहत ते आपटेनगर, नाना पाटीलनगर परिसारच्या मुख्य मार्गाच्या कडेला भाजी विक्रीसाठी बसतात यामुळे वाहतुकीलाही अडथळा होतो. मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.