For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्रिमंडळ पुनर्रचना लांबणीवर?

06:37 AM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
मंत्रिमंडळ पुनर्रचना लांबणीवर
Advertisement

सिद्धरामय्यांनी घेतली खर्गेंची भेट : ठोस निर्णय नाहीच

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा मुद्दा पुन्हा प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत मंत्रिमंडळ पुनर्रचनेवर चर्चा केली. मात्र यावेळी त्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे समजते. मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणावर फेरबदल केल्यास पक्षात नाराजी उफाळून येण्याची शक्यता असल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याचे सूत्रांकडून समजते.  पुढील महिन्यात होणारे बेळगावमधील विधिमंडळ अधिवेशन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व इतर कारणांमुळे सध्या तरी मंत्रिमंडळाची पुनर्रचना होण्याची शक्यता कमी आहे.

Advertisement

बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर शनिवार 15 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्या, अशी सूचना दिली होती. त्यानुसार सोमवारी सिद्धरामय्या यांनी पुन्हा दिल्लीला जाऊन खर्गे यांची भेट घेऊन चर्चा केली. उभयतांमध्ये सुमारे 50 मिनिटे चर्चा झाली. चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी आपण खर्गेंशी मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत चर्चा केलेली नाही, असे स्पष्ट केले. खर्गेंच्या भेटीपूर्वी बोलताना ते म्हणाले, बेळगाव अधिवेशन आणि बिहार निवडणूक निकालावर चर्चा केली आहे. वरिष्ठांनी चार-पाच महिन्यापूर्वीच मंत्रिमंडळ पुनर्रचनेला संमती दिली होती. त्यावेळी आपण सरकारला अडीच वर्षे पूर्ण होतील तेव्हा यावर निर्णय घेता येईल असे सांगितले होते.

इच्छुकांचे लॉबींग

मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत दिल्लीत हालचाली सुरू होताच मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या ज्येष्ठ आमदारांनी लॉबींग चालविली आहे. आपल्या प्रभावाचा वापर करून वरिष्ठ नेत्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न काही जणांनी सुरू केले आहेत. माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी दिल्लीत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अर्धा तासापेक्षा अधिक वेळ चर्चा केली. दुसरीकडे मंत्री कृष्णभैरेगौडा यांच्यासह काही मंत्र्यांनीही दिल्लीला धाव घेतल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. आमदार प्रसाद अब्बय्या, विजयानंद काशप्पनवर आणि सलीम अहमद यांनी मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे उघडपणे बोलून दाखविले आहे.

पक्षाध्यक्षांशी राजकीय मुद्द्यांवर चर्चा नाही : शिवकुमार

आपण रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. त्यांच्याशी राजकीय मुद्द्यांवर चर्चा केलेली नाही. पक्षाच्या नूतन कार्यालयाच्या कोनशीला कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्याची विनंती केली आहे. मी केवळ उपमुख्यमंत्री नाही, पक्षाचा प्रदेशाध्यक्षही आहे. त्यामुळे प्रत्येक दिल्ली दौऱ्यात वरिष्ठांची भेट वरिष्ठांची भेट घेत असतो. 1 डिसेंबरपासून संसदेचे अधिवेशन आहे. त्यामुळे राज्यातील मागण्यांबाबत चर्चा केली आहे, अशी प्रतिक्रिया डी. के. शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Advertisement
Tags :

.