मंत्रिमंडळात बदल शक्य!
मंत्री सतीश जारकीहोळी : ज्येष्ठ आमदारांचा वरिष्ठांवर दबाव
प्रतिनिधी/ बेंगळूर
पक्षश्रेष्ठींवर पक्षातील ज्येष्ठ आमदारांचा दबाव आहे. पक्षात पाच वेळा निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी आम्हालाही संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात बदल होऊ शकतो, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तार करावा की नाही हे वरिष्ठच ठरवतील. मंत्रिमंडळ विस्तार होईल की पुनर्रचना हे देखील माहीत नाही. कोणताही विषय अंगावर ओढवून घेणार नाही. आमचे पद शाबूत राखणे पुरेसे झाले आहे, असे त्यांनी रायचूर येथे सोमवारी पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
आमच्यात मुख्यमंत्री बदल नाही. भाजप सत्तेवर असताना तीन मुख्यमंत्री बदलले. मंत्रिमंडळातही बदल झाला. आमच्यात काहीही बदलले नाही. दोन वर्षांपासून मजबूत सरकार आहे. भविष्याच्या दृष्टीने नेते निर्माण करण्यासाठी भाजप प्रयोग करेल. नव्याने निवडून आलेल्यांना मंत्री बनविण्यात आले. आमच्यातही तसे प्रयोग व्हायला हवेत, असे ते म्हणाले.
विधानपरिषद सदस्यांना मंत्री बनवावे की नाही, यावरही मी भाष्य करणार नाही. प्रत्येक दिल्ली दौऱ्यावेळी मी माझ्या खात्याशी संबंधित विषयांवरच वरिष्ठांशी चर्चा केली आहे, असेही मंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.