For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिकाम्या फ्लॅटमधून कॅब बुकिंग

06:00 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिकाम्या फ्लॅटमधून कॅब बुकिंग
Advertisement

राजस्थानची राजधानी जयपूर येथील एका सोसायटीमध्ये घडलेली एक आश्चर्यकारक घटना सध्या प्रसिद्ध होत आहे. या सोसायटीतील एका फ्लॅटमधून चार तासांच्या कालावधीत 250 कॅब्स बुक केल्या गेल्या. हा प्रकार साधारणत: दुपारी साडेतीन वाजल्यापासून रात्री जवळपास 8 वाजेपर्यंत चालला होता. त्यामुळे दर तीन-चार मिनिटांमध्ये काही कॅब्ज या सोसायटीसमोर येऊन उभ्या रहात असत. या कॅब्जचे चालक मोबाईलवरुन, ज्याने कॅब बुक केली होती. त्याच्याशी संपर्क करीत होते. तथापि, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते निघून जात होते.

Advertisement

एकाच स्थानी अशा प्रकारे अनेक कॅब्ज सतत येत असलेल्या पाहून या सोसायटीचे सुरक्षा रक्षक आणि रखवालदार चक्रावून गेले. त्यांनी नियमानुसार एकाही गाडीला सोसायटीच्या आतल्या भागात जाऊ दिले नाही. कारण, ज्या फ्लॅटमधून हे बुकिंग करण्यात येत होते, त्यात कोणीही रहात नव्हते. तो रिक्त होता, ही बाब या सुरक्षा रक्षकांना ज्ञात होती. या साऱ्या प्रकारामुळे कॅब चालकांची मात्र चांगलीच कोंडी झाली. त्यांचा वेळ आणि कॅबचे डिझेल वाया गेले. शिवाय या वेळेत त्यांना जे खरे ग्राहक मिळाले असते, ते ही मिळाले नाहीत. अशा  प्रकारे त्यांची दुहेरी हानी झाली. पण तक्रार कोणाकडे करणार हा मूळ प्रश्न होता.

हा प्रकार म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा टोळक्याने केलेला खोडसाळपणा असावा, असे अनुमान काढण्यात आले आहे. या फ्लॅटमध्ये कोणीही रहात नाही. याची माहिती असणाऱ्यांपैकी कोणीतरी या फ्लॅटचा पत्ता देऊन या कॅब्ज बुक केल्या असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी सोसायटीच्या व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार सादर केली आहे. चौकशीची चक्रे फिरु लागली आहेत. जयपूर येथे कार्यरत असणाऱ्या कॅब कंपन्यांकडे चौकशी करण्यात येत आहे. तसेच हा फ्लॅट रिकामा असल्याची माहिती कोणाकोणाला असू शकते, याचाही तपास करण्यात येत आहे. तसेच असे करण्यामागचे कारण केवळ खोडसाळपणा हेच आहे, की आणखी काही गंभीर कारस्थान यामागे आहे, याचाही शोध घेतला जात आहे. अद्याप, पोलिसांना कोणतेही धागेदोरे सापडलेले नसले तरी या प्रकारामागचे गूढ शोधण्याचा निर्धार जयपूर पोलिसांनी केल्याचे स्पष्ट केले गेले.

Advertisement

Advertisement
Tags :

.